सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा डंका!
![Independent candidate Vishal Patil victory in Sangli](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/ChandraBabu-Naidu-and-Nitish-Kumar-1-780x470.jpg)
सांगली | लोकसभा निवडणुकीचा महानिकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. तर महायुतीला मोठा फटका बसतानाची चिन्हे आहेत. तर सांगलीच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी गुलाल उधळला आहे. सांगलीत चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून तर महायुतीकडून संजयकाका पाटील निवडणूक रिंगणात होते.
विशाल पाटील यांना ५ लाख ५ हजार मते, संजयकाका पाटील यांना ४ लाख २० हजार मते तर मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ ५५ हजार मते पडली. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचा मोठा पराभव केला.
हेही वाचा – चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी भाजपसोबत येण्यासाठी केली ही महत्त्वाची मागणी!
या निकालावर विशाल पाटील म्हणाले की, अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे माझा प्रचार केला. पतंगराव कदम यांना मानणारा मोठा गट माझ्या पाठीशी होता. त्यांनी मला मोठं मताधिक्य दिलं. आर.आर पाटील यांच्या मतदारसंघातही मला मताधिक्य मिळालं. आर.आर पाटलांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते असं त्यांनी सांगितले.
तसेच अनिल बाबर यांच्या मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग माझ्या पाठीशी राहिला. विटा शहरात नगरसेवकांनी माझ्या पाठीशी राहिले होते. अनेकांनी धाडसानं माझं काम केले, मिरजमधून मला २५ हजारांचं मताधिक्य मिळालं. सांगलीत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत राहिले हे निकालातून दिसते. हा विजय जनतेचा आहे. ज्या लोकांनी माझं काम केले, त्यांना त्रास दिला गेला. या लोकांच्या पाठी मी उभा आहे. ज्यांनी मतदान केले नाही त्यांच्याबाबत आकस नाही. मी सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून लोकसभेत काम करणार आहे असंही विशाल पाटील यांनी म्हटलं.