ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

नरेश म्हस्केंसाठी गोविंदा मैदानात

ठाण्यात महायुतीचा प्रचार जोरदार

ठाणे : कुली नंबर वन…जोडी नंबर वन…हिरो नंबर वन या एकापेक्षा एक ‘नंबर वन’ चित्रपटानंतर राजकीय क्षेत्रात ‘नंबर वन’ कामगिरी करण्यासाठी उतरलेल्या सिने अभिनेता गोविंदाने सोमवारी ठाण्यात महायुतीच्या नरेश म्हस्के यांचा जोरदार प्रचार केला. खुल्या प्रचार रथातून उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय वस्तीत गोविंदा यांनी केलेल्या रॅलीत प्रचार गीतावर तरुणाई थिरकली. आता या ‘सिनेप्रचारा’तून मतदार कसे आकर्षित होतात, हे पाहावे लागेल.

ठाणे शहर विधानसभा क्षेत्रअंतर्गत घोडबंदर रोड येथील डोंगरी पाडा येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. मोटारसायकलस्वार मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते. ठाणे पालिका आयुक्त बंगला, हिरानंदानी मेडोज, ब्रम्हांड सर्कल, ढोकाळी शाखेपर्यंत प्रचार फेरी आल्यानंतर गोविंदा या प्रचार फेरीत सहभागी झाले. ढोल-ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गोविंदा यांचे स्वागत करण्यात आले.

महिला भगिनींनी गोविंदा आणि नरेश म्हस्के यांचे औक्षण केले. तसेच मनोरमानगर, दुर्गा चौक, मानपाडा प्रभाग कार्यालय, पेट्रोल पंप येथे फिरून माजिवडा गाव येथेही प्रचार फेरी फिरुन रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रचार फेरीत भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, जेष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, कविता पाटील, किरण मणेरा, अर्चना पाटील, निशा पाटील, रवी पाटील, प्रवीण नागरे आदी सहभागी झाले होते.

ठाकरे गटाला प्रत्युत्तर
शिवसेनेतील फुटीनंतर मनोरमा नगर येथे शिवसेना शिंदे गट – ठाकरे गट यांच्यात वादाचा प्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते याठिकाणी आमनेसामने आले होते. गेल्याच आठवड्यात इंडिया – महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांची मनोरमा नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा झाली होती. या चौकातच महायुतीने गोविंदा यांना घेऊन केलेल्या प्रचार रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button