#HathrasCase: हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, पीडितेच्या भावाची मागणी
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील सरकारवरुन सुद्धा चहूबाजूंनी सडकून टिका केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता पीडितेचा भाऊ याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.
तसेच या प्रकरणाची हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाशीधांच्या अंतर्गत चौकशी केली जावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह परिवाराला दिला गेलेला नाही. त्यामुळे परिवाराला तिला शेवटचे पाहता ही आलेले नसून पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप लावण्यात येत आहे. अंत्यसंस्कारानंतर पीडितेला बघणे तर दूर पण भावाने तिच्या अस्थी जमा करताना त्याल अश्रु अनावर झाल्याचे दिसून आलेले आहे. तसेच जो पर्यंत तिला न्याय दिला जात नाही तो पर्यंत तिच्या अस्थी विसर्जन करणार नसल्याचे ही त्याने स्पष्ट केलेले आहे.