आक्षेप घेणाऱ्याने ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाचलंय का? मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान

सोलापूर | गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याचा फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर, शिवसेना आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत गायकवाड यांचे कान टोचले आहेत.
निरर्थक वाद निर्माण केला गेला आहे, आपल्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कुणीही अपमान करु शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कुणीही त्यांचा अशा पद्धतीने अपमान करणं शक्यच नाही. जे पुस्तक लिहिलं गेलं आहे, ते १९७९ ला लिहिलं गेलं त्याच्यावर आज वाद उकरुन काढायचा आणि दोन्ही बाजूंनी भिडायचं हे शुद्ध असामाजिक, असंवेदनशील असं हे कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे का? हे मला माहीत नाही. आंदोलन करणाऱ्यांना ते आंदोलन का करत आहेत हे त्यांना माहीत आहे का हे मला माहीत नाही. केवळ कुठला तरी मुद्दा उपस्थित करायचा आणि चर्चेत राहायचं हे काही योग्य नाही. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.
हेही वाचा
पाकिस्तानात पेट्रोल साठा संपला; मंत्र्यांची धक्कादायक कबुली
काय आहे नेमकं प्रकरण?
गोविंद पानसरे यांनी १९७९ मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोन करून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर विविध स्तरांतून गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.





