मागासवर्गीय आयोगाचा माराठा आयोग करणार का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल
![Gunaratna Sadavarte said whether the Maratha Commission of the Backward Classes Commission will be done](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Gunaratna-Sadavarte-780x470.jpg)
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला. यानंतर राज्य सरकारने आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची मंगळवारी नियुक्ती केली. मात्र, या नियुक्तीला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. जरांगे समोर विनवणी करणाऱ्या व्यक्तीला मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष का बनविता? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे. आपण राज्य मागासवर्गीय आयोगावर माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला माझा आक्षेप आहे. मा. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची नेमणूक करण्यासाठी न्यायवृंद पद्धत आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करताना अशा काही पद्धतीचा विचार केला गेला पाहीजे. आयोगाचा अध्यक्ष निष्पक्ष काम करावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे अध्यक्ष निवडण्यासाठी निवड समिती असावी, अर्ज मागवायला हवेत. असे काही झालेले मला तरी दिसत नाही.
हेही वाचा – पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? अजित पवारांचं सभागृहात धक्कादायक विधान
मागासवर्गीय आयोगाने स्वतंत्र पद्धतीने काम केले पाहीजे. परंतु कोणत्याच विद्यापीठाची शिफारश नाही. अर्ज मागितले की नाही, हेदेखील कुणाला माहीत नाही. न्या. शुक्रे हे मागे एकदा जालन्याला गेलेले आम्ही पाहीले. तिथे त्यांनी हात जोडून जरांगेशी वार्तालाप केला. मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरच होईल, अशी विनवणी न्या. शुक्रे करताना पाहिले. राज्य मागासवर्गीय आयोग हा वंचितांना, मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी आहे. न्या. शुक्रे यांच्या नियुक्तीनंतर मला ओबीसी समाजातील अनेकांनी फोन करून त्यांच्या नियुक्तीबाबत चिंता व्यक्त केली. न्या. शुक्रे यांच्या नियुक्ताला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. या नियुक्तीतून मला प्रश्न विचारायचा आहे की, आपण मागासवर्गीय आयोग निर्माण करायला निघालो आहोत की, मराठा आयोग निर्माण करत आहोत, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
न्या. शुक्रे यांचा जो काही अहवाल येईल, तो अहवाल जरांगे यांच्या त्या जालन्यातील भेटीशी जोडला जाईल. त्यामुळे न्या. शुक्रे यांनी ही नियुक्ती स्वीकारू नये. त्यांनी जर ही नियुक्ती स्वीकारली तर आम्ही आमची बाजू न्यायिक पद्धतीने मांडत राहू, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.