ग्राऊंड रिपोर्ट: महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रसिद्धीपत्रकात ‘सिली मिस्टेक्स’!
प्रचारप्रमुख भोईरांच्या पदाबाबत ‘टायपिंग मिस्टेक’
माजी महापौर संजोग वाघेरेंचा उल्लेख संजय वाघेरे
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपळे सौदागर सारख्या सुशिक्षीत आणि उच्चभ्रू वस्तीचे २००७ पासून नेतृत्व करणारे अभ्यासू आणि प्रोफेशनल नेते अशी ओळख निर्माण केलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये गंभीर चुका झाल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषेवर प्रेम करणारा मोठा वर्ग नाराज झाला असून, पुरेसे भाषाज्ञान नसलेला आमदार चिंचवडकर निवडून देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीपत्रक पाठवण्यात आले. मात्र, त्यामध्ये अनेक चुका असल्याने माध्यमप्रतिनिधींमध्ये चर्चा रंगली आहे.
दिवसभरात घडलेल्या किंवा नियोजित कार्यक्रमांची प्रसारमाध्यमाना अधिकृतपणे माहिती दिली जाते. त्यासाठी नाना काटे कार्यालयाकडून ई-मेल आणि व्हॉट्सॲप यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे सोशल मीडिया आणि प्रमुख प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती प्रसिद्धीकामी प्रसारमाध्यमांना पोहोचवली जाते.
प्रचार शुभारंभाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये थेट प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांचे पदाबाबतचा उल्लेख टायपिंग मिस्टेक झाली आहे. तसेच, प्रचाराचा शुभारंभ श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिरातून करण्यात आला. त्याचा उल्लेख ‘श्रीमन’ आणि महान साधू असा चुकीच्या पद्धतीने केला आहे. यासह भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा चक्क आमदार असा नामोल्लेख आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे- पाटील यांच्या नावाचा उल्लेख ‘संजय’ असा केलेला दिसतो. असा चुकांसोबत प्रसिद्धीपत्रक सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. विशेषत: चिंचवड गाव आणि परिसरातील सुशिक्षीत मतदारांकडून अशा चुकांबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटतात.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक विकसित आणि सुशिक्षीत परिसराचे नेतृत्व करणारे नाना काटे आणि टीमकडून मराठी भाषेबाबत आणि शहरातील ज्येष्ठ पदाधिकारी, नेत्यांचा उल्लेख ऐन निवडणुकीच्या काळात चुकीच्या पद्धतीने करणे किंवा अनाहूतपणे करणे…ही बाब अशोभनीय आहे. त्यामुळे मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसलेल्या उमेदवाराला मतदान का करावे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
यंत्रणेच्या चुका नानांचा काय दोष..?
वास्तविक, विठ्ठल उर्फ नाना काटे उमेदवार आहेत. प्रसिद्धीपत्रक आणि संबंधित यंत्रणेचे कामकाज पाहण्यासाठी अनुभवी टीम तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईतून तज्ज्ञांची टीम दिवसरात्र मेहनत घेत आहे. तब्बल ४५० हून अधिक आयटीएन्स नानांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी आहेत, असा दावा काटे यांच्या निकटवर्तींकडून केला जातो. त्यामुळे नाना काटे यांना प्रसिद्घी विभागाच्या चुकांचा दोष देता येणार नाही, असे सांगण्यात येते.