Ground Report । अजित गव्हाणेंची ‘एन्ट्री’ अन् राष्ट्रवादीत अंतर्गत कलहाची ‘तुतारी’
भाजपाच्या माजी नगरसेविका सीमा सावळेंच्या प्रवेशाचा दावा : पिंपरी विधानसभेतील सुलक्षणा शिलवंत यांचे तिकीट धोक्यात
![Ground Report. 'Entry' of Ajit Gavan and 'Tutari' of internal strife in NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Ajit-Gavhane-Sulakshana-Dhar-Seema-Sawale-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुरुंग लावल्यानंतर अजित गव्हाणे यांनी आता भाजपातील नाराज माजी नगरसेवकांची मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांचे नाव यामध्ये आघाडीवर आहे. तसे, जाहीरपणे गव्हाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे खळबळ उडाली असून, पिंपरी विधानसभा मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
माजी नगरसेविका सीमा सावळे या पिंपरी विधानसभेतून तीव्र इच्छुक आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन एकत्र राष्ट्रवादीच्या कर्दनकाळ म्हणून त्यांचे पाहिले जाते. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी राष्ट्रवादीला सळो की पळो करुन सोडले होते. यासह स्थानिक गाववाले नेत्यांना थेट भिडण्याची क्षमता असलेल्या सावळे यांनी आता पिंपरीतून ‘विकासाला हवा चेहरा नवा’ असा निर्धार केला आहे.
अजित गव्हाणे यांच्या समर्थक म्हणून आता सावळे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशकर्त्या होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून म्हणजेच, महाविकास आघाडीकडून तिकीटाचे ‘कन्फर्मेशन’ झाल्याशिवाय सावळे एव्हढा मोठा निर्णय घेतील, असे वाटत नाही. त्यामुळे ज्याअर्थी गव्हाणे छातीठोकपणे सांगतात की, सीमा सावळे प्रवेश करतील. त्यामुळे शरद पवार गटाच्या इच्छुक माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांना तिकीटावर पाणी सोडावे लागण्याची दाट शक्यता आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दमदार यशानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या पुढाकाराने विजयी संकल्प मेळावा होत आहे. या मेळाव्याचे शहरभरात ‘ब्रँडिंग’ करण्यात आले. मात्र, सदर फ्लेक्सवर भोसरीतून विधानसभेसाठी इच्छुक असलेले संभाव्य उमेदवार अजित गव्हाणे यांचा फोटो नाही. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये भोसरीत जनता दरबार होणार होता. तो कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. तसेच, गव्हाणेंच्या प्रवेशावेळी कोल्हे उपस्थित नव्हते. त्यामुळे गव्हाणे यांच्या प्रवेशावर खासदार कोल्हे नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘आयातांना’ उमेदवारी अन् निष्ठावंतांच्या हातावर तुरी…
निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत दैदीप्यमान यश मिळवले आहे. त्यामुळे आता ‘संधीसाधु’ लोकांना पक्षात घेवू नका आणि घेतलेच तर उमेदवारी देवू नका… असा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे. याबाबत पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मशुद्धीकरणाच्या इतिहासाचा दाखला देत ‘‘मी सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेशी सहमत आहे’’, असे म्हटले होते. त्यामुळे अजित गव्हाणे ज्यावेळी पुण्यात प्रवेशकर्ते झाले. त्यावेळी खासदार कोल्हे यांची अनुपस्थिती राजकीय संकेत देणारी आहे. आता पिंपरी मतदार संघातून सीमा सावळे यांचे नाव निश्चित झाले, तर सुलक्षणा शिलवंत धर यांचा पत्ता कट होणार आहे. ज्या काळात पक्षाला शहराध्यक्ष अथवा चेहरा नव्हता. त्यावेळी माजी नगरसेवक तुषार कामठे आणि सुलक्षणा शिलवंत यांनी ‘रिस्क’ घेतली. विचारांच्या मुद्यावर ही मंडळी शरद पवार साहेबांसोबत राहीली, आता निवडणुकीच्या चढाओढीत ‘आयातांना’ उमेदवारी अन् निष्ठावंतांच्या हातावर तुरी… देण्याची भूमिका पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार घेणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.