breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणलेखसंपादकीयसंपादकीय विभागसिटझन रिपोर्टर

Ground Report : … श्रेय ‘रोडमॅन’ गडकरी साहेबांचे!

राजकीय श्रेय नव्हे, प्रकल्प मार्गी लागल्याचे समाधान : खासदार, आमदारांची भूमिका ‘नो पॉलिटिक्स’

नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर

पिंपरी । अधिकराव दिवे-पाटील

पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक पट्टयाला जोडणारा बहुप्रतिक्षित नाशिक फाटा ते खेड ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळात मंजुरी मिळाली. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पावरुन ‘नो पॉलिटिक्स’ अशी भूमिका घेतल्याचे दिसते.

तब्बल ७ हजार ८२७ कोटी रुपयांच्या ‘बिग बजेट’ प्रकल्पावरुन श्रेयवादाचा भडका व्हावा आणि आपला राजकीय स्वार्थ साधावा, या मानसिकतेतून ‘विष पेरणी’चा प्रयत्न समाजमाध्यमांमधून केला जातो आहे. या निमित्ताने ‘महाईन्यूज’ ने आजी-माजी खासदार, आमदार यांच्याशी संपर्क केला आणि भूमिका जाणून घेतली आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत देशातील ९३६ किलोमीटर अंतराच्या आठ मार्गांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी ५० हजार ६५५ कोटी रुपये खर्च होणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर ३० किलोमीटर अंतराच्या मार्गाचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे. आता हा प्रकल्प भाजपाप्रणित केंद्र सरकार आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामाध्यमातून मार्गी लागणार आहे, असे असले तरी पाठपुरावा कोणी केला? आणि श्रेय कुणाचे ? यावरुन राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वास्तविक, शिरुर लोकसभा आणि दोन विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या या मार्गासाठी त्या-त्या लोकप्रतिनिधीने आपआपल्या पातळीवर पाठपुरावा केला आहे. शिरुरचे माजी खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी, तर विद्यमान खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठपुरावा केला आहे. राज्य व केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून महेश लांडगे यांनीही या प्रकलपासाठी सभागृहात भूमिका मांडली, ही वस्तुस्थिती आहे.

‘‘सदर प्रकल्पाचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आहे. प्रकल्प होतो आहे, ही बाब महत्त्वाची आहे’’ अशी भूमिका घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकीय प्रगल्भता दाखवली आहे किंबहुना या प्रकल्पावर श्रेयवाद निर्माण करणाऱ्यांचे अप्रत्यक्ष कान टोचले आहेत.

२०११ मध्ये चाकण एमआयडीसीमधील उद्योजकांच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत नाशिक फाटा ते खेड दरम्यान महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा विचार करुन हा रस्ता सहापदरी करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याप्रमाणे २०१६ मध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली होती. २०१७ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, महानगरपालिका हद्दीतील आराखड्यामध्ये बदल सुचवल्यामुळे काम सुरू झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प मार्गी लागतोय, ही समाधानाची बाब आहे, अशी भूमिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आहे.

दरम्यान, नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पावरुन ‘राजकीय वनवा’ पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पसंतुष्ठांना आजी-माजी खासदार व आमदारांनी चपराक दिली आहे. एखादा चांगला प्रकल्प होत असेल, तर त्यामुळे श्रेयाची लढाई न करता लोकहितासाठी पक्षीय मतभेद बाजुला ठेवून एकत्रित पाठपुरावा केला पाहिजे, असा संदेश दिला आहे. त्यामुळे ‘टाक काडी अन्‌ लाव आग’ वाल्या कथित ‘राजकीय कावळ्यांचा’ पुरता भ्रमनिरास झाला आहे.

आठवडाभरापूर्वी गडकरी साहेबांची या प्रकल्पाबाबत भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आश्वस्त केले होते. पूर्वी निविदा प्रक्रिया सुरू झालेली असतानाही केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मान्यतेबाबत यामध्ये अट घातली होती. या प्रकल्पबाबात सर्व श्रेय गडकरी साहेबांचे आहे. डीपीआर, टेंडर प्रोसेस सर्व बाबी प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होईल. यासाठी मी स्वत: योग्य तो पाठपुरावा करणार आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरुर लोकसभा.

चाकण औद्योगिक पट्टयातील उद्योजकांसोबत अनेकदा बैठका झाल्या. उद्योजकांच्या अगदी PMO पर्यंत तक्रारी गेल्या. २०१६ मध्ये गडकरी साहेबांनी ‘डीपीआर’ला मंजुरी दिली. २०१७ मध्ये निविदा काढण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने या प्रकल्पामध्ये मेट्रो समाविष्ट करण्याचा मुद्दा पुढे केला. तांत्रिक कारणामुळे टेंडर थांबले. उद्योजकांनी अगदी PMO पर्यंत तक्रारी गेल्या. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प मार्गी लागत आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिरुर लोकसभा.

केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार आहे. माझ्या मतदार संघातून नाशिक फाटा ते खेड राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे मी माझ्या परीने राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे मी केंद्र सरकारचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानले आहेत. श्रेयासाठी नव्हे, तर लोकहिताच्या प्रकल्पासाठी एकत्रितपणे सर्वांनी आपआपल्या परीने पाठपुरावा केला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button