गिरीश महाजन यांचे पालकमंत्री पदावर वक्तव्य
‘पालकमंत्री पदाबाबत देवाला माहिती. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत
![Girish Mahajan, Palak, Mantra, Post, Speech, God, crores,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/chava-1-780x470.jpg)
महाराष्ट्र : निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न झाली. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडते. यंदाच्या वर्षी नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती असल्यानं महापूजेचा मान कुणाला याबाबत चर्चा सुरू होती. शासकीय महापूजेला गिरीश महाजन सपत्नीक उपस्थित होते. गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार हिरामण खोसकरही सपत्नीक उपस्थित होते. नाशिकमध्ये गिरीश महाजन बोलत होते. निवृत्तीनाथ महाराजांच्या शासकीय महापूजेबद्दल बोलता ते म्हणाले की, “मला दुसऱ्यांदा योग आला. काल अमित भाई सोबत आलो. आज पुन्हा पूजेसाठी आलो. मी चौथ्यांदा पूजा करतोय. कुंभमेळा मंत्री म्हणून माझं नाव घोषित झालं आहे. सुरक्षित कुंभमेळा करू. तयारीला सुरुवात केली आहे” अंस गिरीश महाजन म्हणाले.
नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत वाद झाला. दादा भुसे यांच्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती. गिरीश महाजन यांना पालकमंत्री पदावरुन निर्माण झालेल्या पेचाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ‘पालकमंत्री पदाबाबत देवाला माहिती. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत’ असं उत्तर दिलं. ‘रायगड आणि नाशिक बाबत चर्चा करून प्रश्न सुटेल’ असही ते म्हणाले.
हेही वाचा : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना शपथ
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याबद्दल काय माहिती दिली?
मंदिर निधीबद्दल म्हणाले की, “काही निधी येणे बाकी आहे. तात्काळ पाठपुरावा करून निधी आणला जाईल. निधी कमी पडू देणार नाही” नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याबद्दलही गिरीश महाजन यांनी माहिती दिली. “कुंभ मेळ्याबाबत विस्तृत बैठक झाली आहे. सर्व खात्याचे सचिव होते. सर्व अधिकारी होते, वेळ कमी आहे. तयारी लवकर करावी लागणार. प्रयागराजला व्यवस्था पाहण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन जाणार आहे. तिथल्या चांगल्या वेंडरशी बोलणार आहे” असं गिरीश महाजन म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशावर काय म्हणाले?
छगन भुजबळ यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल म्हणाले की, “मला वाटतं तो कार्यक्रम भाजपचा नव्हता. सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले होते, ते भाजपच्या कार्यक्रमाला आले नव्हते. भुजबळ साहेब जेष्ठ नेते, सिनियर आहेत. साहजिक आहे खुर्ची दिली. मी लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे”