महाविकास आघाडीत ‘‘बिघाडी’’? : राहुल कलाटे अन् नाना काटेसुद्धा उमेदवारी अर्ज भरणार!
!["Failure" in Mahavikas Aghadi? : Rahul Kalate and Nana Kate will also fill the nomination form!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Pimpri-chinchwad-rahul-nana-jagatap-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, प्रमुख दावेदार राहुल कलाटे आणि नाना काटे दोघेही अर्ज भरणार असल्याने महाविकास आघाडीत ‘‘बिघाडी’’ झाल्याचे पहायला मिळणार आहे.
देगलूर, पंढरपूर, कोल्हापूरच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. पण, त्यानंतरच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपाने आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या “घड्याळ” चिन्हावर महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज दाखल करेल, अशी माहिती अजित पवार यांनी काल रात्री दिली होती.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सर्व आजी-माजी नगरसेवक, सेल अध्यक्ष, सर्व सेल कार्यकारणी, प्रभाग-वार्ड अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आपणांस कळविण्यात येते की, उद्या मंगळवार दि.०७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.अजितदादा पवार तसेच शहरातील जेष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०५ चिंचवड विधानसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारीचा अर्ज रॅली द्वारे दाखल करण्यात येणार आहे, असा ‘मॅसेज’ रात्री उशीरा केला आहे.
रावेत- किवळे येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री अजित पवार यांनी निवडक नेत्यांची बैठक घेतली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, इच्छुक उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.
दरम्यान, महाविकास आघाडीचा घटकपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राहुल कलाटे यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांतील खलबतानंतर कलाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत खलबत सुरू होती. शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीकडून उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले.
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे यापैकी कोणाला महाविकास आघाडीचा फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच, नाना काटे, राहुल कलाटे आणि अश्विनी जगताप अशी त्रिशंकू लढत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पहायला मिळणार आहे.