FACT CHECK : इंद्रायणीतील जलपर्णी कामात ३५० कोटी रुपयांचा घोटाळा… यात तथ्य आहे का?
चिखलफेकीच्या राजकारणात महानगरपालिका प्रशासन व ठेकेदारांची नाहक बदनामी
![FACT CHECK: Rs 350 crore scam in Jalparni work in Indrayani... Is it true?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Jalparni-1-780x470.jpg)
‘Fake Narrative’ द्वारे पिंपरी-चिंचवडकर नागरिकांची दिशाभूल करण्याचा ‘सिलसीला’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आषाढ वारी सोहळा सुरू झाला. त्यावेळी देहू आणि आळंदीत जमलेल्या लाखो वारकऱ्यांना भावनिक साद घालण्यात आली. ‘‘नदी संवंर्धन’’ हा मुद्दा ही लोकचळवळ होणे अपेक्षीत असताना हा विषय ‘राजकीय’ झाला आणि एखाद्या लोकहिताच्या कामात राजकारण आले की, त्याचा बट्टयाबोळ होतो, हे सर्वश्रूत आहे.
मावळात उगम पावणारी इंद्रायणी नदी श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी अशा तीर्थस्थळांना जोडूत पुढे भामा आणि शेवटी वढू-तुळापूर येथील भीमा नदीला संगम पावते. राजकीय चौकटीतून विचार केला असता मावळ लोकसभा, शिरुर लोकसभा आणि मावळ, पिंपरी, चिंचवड, भोसरी, खेड अशा विधानसभा क्षेत्रातून वाहते. म्हणजेच २ खासदार आणि किमान ७ विधानसभा सदस्यांच्या कार्यक्षेत्रातून वाहणारी ही नदी.
लोणावळा नगरपरिषद, तळेगाव नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आळंदी नगरपरिषद, एमआयडीसी, पीएमआरडीए आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासाठी केवळ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. कारण, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या निमित्ताने ‘नमामी इंद्रायणी’ असा प्रकल्प त्यांन हाती घेतला. तसेच, इंद्रायणी नदीच्या नावाने नदी प्रदूषण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन, मातेसमान महिला भगिनींना हक्काचे व्यासपीठ मिळावे. या करिता ‘इंद्रायणी थडी’ असे ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचे उपक्रम प्रतिवर्षी घेण्यात आले. नदी संवर्धनाबाबत लोकचळवळ उभी राहते आहे. त्याचा राजकीय फायदा महेश लांडगे यांना होतो आहे, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महेश लांडगे विरोधकांकडून या प्रकल्पाबाबत राजकीय आरोप आणि टीका-टीप्पण्णी केली जात आहे.
‘सोशल मीडिया’वर गेल्या महिनाभरापासून इंद्रायणी जलपर्णी, ३५० कोटी रुपयांचा घोटाळा, २४ कोटी रुपयांचा घोटाळा, मॅजेन केलेल्या रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहेत. तसेच, जलपर्णी काढण्याचे काम आमदार महेश लांडगे यांच्या मर्जीतील ठेकेदाराला दिले, असे पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे जलपर्णी काढण्याचे कामाचे वास्तविक टेंडर, त्याची रक्कम, झालेला खर्च, कामाचे स्वरुप आणि पारदर्शीपणा याबाबत ‘महाईन्यूज’च्या माध्यमातून महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाकडून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुढील बाबी लक्षात आल्या आहेत.
1. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याची निविदा (टेंडर) दि. २७ जुलै २०२३ निश्चित करण्यात आली. ही निविदा २ कोटी ३५ लाख ८ हजार रुपयांची होती. महानगरपालिका प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या mahaetender.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेत स्पर्धा झाली. त्यामध्ये ३ टक्के कमी दराने म्हणजे २ कोटी २८ लाख २ हजार रुपयांमध्ये पात्र असलेल्या कंपनीला ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली.
2. सदर २ कोटी २८ लाख २ हजार रुपयांमध्ये १ कोटी ३७ लाख ६ हजार रुपयांची तरतूद जलपर्णी काढणे आणि नदीपात्र स्वच्छ ठेवणे या कामासाठी होती. उर्वरित अंदाजे ९० लाख ९६ हजार ही रक्कम सेबर टँक (S.A.B.R.E Tank) व फ्लोटींग बायोरिॲक्टर या मशीनरीद्वारे पाण्यातील ऑक्सिजन वाढवणे व पाण्याच्या शुद्धतेचा दर्जा वाढवण्यासाठी खर्च करण्याचे निश्चित झाले होते.
3. महानगरपालिका प्रशासनातील आकडेवारीनुसार, १ कोटी ३७ लाख ६ हजार इतकी रक्कम इंद्रायणी नदीपात्रात तळवडे ते चऱ्होली या २० किलोमीटर अंतरादरम्यानची जलपर्णी काढण्याच्या कामावर खर्च होणार असून, कामाचा कालावधी पावसाळा सोडून ९ महिने असा आहे. प्रति महिना १५ लाख २२ हजार रुपये इतका खर्च जलपर्णी काढण्यावर होतो.
4. गेल्या ८ महिन्यांमध्ये महानरगपालिकेच्या नोंदीनुसार, दि. १ नोव्हेंबर २०२३ ते दि. ३० जून- २०२४ पर्यंत जलपर्णी काढण्याचे काम करुन घेण्यात आले. जलपर्णी काढण्याच्या कामासाठी प्रत्येक दिवसाचे GIS लोकेशन फोटो ज्यामध्ये लोकेशन, वेळ, दिनांक असे फोटो आणि नियमाप्रमाणे ड्रोन कॅमेरातून टिपलेले नदीपात्राच्या स्वच्छतेबाबतचे व्हीडिओ आहेत तसेच, मशीन खरेदीबाबतची अधिकृत बीले महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदीत आहेत.
भूमिपुत्रांना मिळाला व्यावसाय पण…
जलपर्णी काढण्याच्या कामात भोसरी विधानसभा मतदार संघातील मोशीतील नवनाथ सस्ते, भानुदास सस्ते, चिखलीतील संतोष म्हेत्रे, तळवडेतील ऋषिकेश भालेकर, सागर भालेकर या भूमिपुत्रांच्या जेसीबी, पोकलँड अशा मशीन कार्यरत होत्या, अशी माहिती प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे समजली. या कामामध्ये गेल्या ८ महिन्यांपासून एकूण ४० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे. पण, चुकीच्या आरोपांमुळे भूमिपूत्र व संबंधिक कामगारांची नाहक बदनामी होत आहे.
काम केले तरी जलपर्णी आली कोठून?
महानगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार, सदर काम पावसाळा सुरू होणार असल्यामुळे दि. ३० जून २०२४ रोजी बंद करण्यात आले. त्यानंतरच्या काळात मावळ परिसरात संततधार पावसामुळे नदीपात्रात पाणीपातळी वाढली. लोणावळा, तळेगाव, देहू या भागातून मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आणि तळवडे हद्दीलगत बांधलेल्या ‘ट्रॅश बूम बॅरिअर’ला अडकली. दि. ३ जुलै २०२४ रोजी जलपर्णी व पाण्याच्या दबावामुळे ‘ट्रॅश बूम बॅरिअर’ तुटला आणि सर्व जलपर्णी वाहत येत तळवडे, मोई, मोशी, आळंदी या भागातील पूल आणि बंधारा अशा ठिकाणी अडकली होती, याची खातरजमा फोटो आणि व्हीडिओ पाहून करण्यात आली आहे.