इंग्लंडच्या क्रिकेटर पीटरसनची PM मोदींवर स्तुतीसुमने, टायगर प्रोजेक्टला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचा बांदीपूर, मुदुमलाई व्याघ्र दौरा
![England, Cricketer Pietersen, Tribute to PM Modi, Tiger Project, 50 Years, PM Modi, Bandipur, Mudumalai Tiger Tour,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/pm-780x470.png)
मुंबई : बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रविवारी वेगळा अंदाज पाहायला मिळाला. काळी टोपी, स्टायलिश चष्मा, प्रिंटेड टी-शर्ट आणि खाकी रंगाचे हाफ जॅकेट परिधान करुन पंतप्रधान मोदी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा करण्यासाठी पोहोचले. टायगर प्रोजेक्टला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींना छायाचित्र काढण्याची हौस आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. आजही मोदींनी आपल्या कॅमेरातून एक सौ एक सुंदर छायाचित्रं काढली. त्यांनी स्वत:च्या हाताने हत्तीला ऊस खाऊ घातला आणि दुर्बिणीच्या साहाय्याने जंगलामधील मनमोहक दृश्यांचा आनंदही घेतला. जंगलसफारीदरम्यानचा मोदींचा स्वॅग पाहून इंग्लंडचा माजी फलंदाज आणि वन्यजीवप्रेमी केवीन पीटरसन भारावून गेला. त्याने मोदींवर स्तुतीसुमनांची उधळण करणारं ट्विट केलंय.
पंतप्रधान मोदींनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्तींच्या छावणीलाही भेट दिली. हा तोच हत्तींचा कॅम्प आहे जिथे ऑस्कर विजेता ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ माहितीपटातील रघू (हत्ती) वास्तव्य करतो. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ही भारतातील पहिली डॉक्युमेंटरी आहे, जिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी बेली आणि बोमन या आदिवासी जोडप्याची भेट घेतली ज्यांनी रघू या हत्तीच्या बाळाला वाढवले. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केवीन पीटरसनने ट्विट करुन आपल्या मनातील भावना ट्विटरद्वारे बोलून दाखवल्या आहेत.
पीटरसन काय म्हणालाय?
आदर्श प्रेरणादायी जागतिक नेता जो वन्य प्राण्यांवर प्रेम करतो, नैसर्गिक अधिवासात त्यांच्यासोबत वेळ घालवताना खूप उत्साही असतो. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या वाढदिवशी, त्यांनी भारतातील जंगलात चित्ते आणून सोडले होते… अशा शब्दात पीटरसनने मोदींवर स्तुतीसुमनांची उधळण केलीये.
मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हैसूरला पोहोचले. तिथे त्यांनी टायगर प्रोजेक्टला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व्याघ्र संवर्धनासाठी अमृत कालचे व्हिजन आणि स्मारक नाणेही त्यांनी जारी केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी २०२२ व्याघ्रगणना प्रसिद्ध केली. वाघांची संख्या वाढून ३ हजार १६७ झाली आहे.