महायुतीला किती जागा मिळणार? एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा
![Eknath Shinde said that we will get at least 170 seats.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Eknath-Shinde-780x470.jpg)
मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीने आम्हाला १८० जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. आता एकनाथ शिंदे यांनी महायुतीला किती जागा मिळतील ते सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, की आमच्याकडे खरी शिवसेना आहे, तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हही आमच्याकडे आहे. लोकसभेत जी लढाई झाली त्यात शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना यांच्यात १३ ठिकाणी लढत होती. त्यातल्या सात जागा आम्हाला मिळाल्या. आम्ही सत्ता सोडून विरोधी बाजूने गेलो, काय होईल ते माहीत नव्हतं. ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली आणि महाविकास आघाडी स्थापन करुन बाळासाहेब ठाकरेंचे विचार धुळीला मिळवले अशा लोकांबरोबर आम्ही थांबलो नाही. पदासाठी नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आम्ही त्या सत्तेतून बाहेर पडलो आणि बंड केलं.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याही बॅगा तपासा; उद्धव ठाकरेंचं आव्हान
महाविकास आघाडीने अडीच वर्षांत केलेलं काम आणि महायुतीने दोन ते सव्वादोन वर्षांत केलेलं काम याचा आढावा घेतला तरीही तुम्हाला फरक लक्षात येईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. सगळ्या गोष्टी बंद पाडणं हे महाविकास आघाडी सरकारचं काम होतं. तर सगळ्या गोष्टींना गती देणं हे काम आमच्या सरकारने करुन दाखवलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, महायुतीला किती जागा मिळतील हे विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या १७० जागा तरी येतील असा विश्वास मला आहे. कारण लोकांचं प्रेम, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.