शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘एमएस धोनी’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde | शहाजीबापू पाटील हा सरळसोट आणि अस्सल रांगडा माणूस आहे. त्यांनी सांगोल्यासह मुंबई ते थेट गोवाहाटीही जिंकली आहे. काय ती झाडी, काय तो डोंगार, काय ते हॉटिल, समदं ओक्के, अशा अस्सल ग्रामीण ढंगात केलेल्या संवादामुळे ते देश-विदेशात प्रसिद्ध झाले आहेत. खरे तर शहाजीबापू पाटील हे आमच्या टीमचे महेंद्र धोनी आहेत. त्यांना छप्परफाड मतांनी निवडून दिल्यास सांगोलेकरांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते सांगोल्यात आयोजित विराट सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, की राज्यातील बहिणी, भाऊ, शेतकरी, वारकरी हे सारेच माझे लाडके आहेत. शहाजीबापू पाटील हे माझे सर्वात लाडके आहेत. ते माझ्या टीमचे महेंद्र धोनी आहेत. विरोधकांकडून आलेल्या प्रत्येक चेंडूवर ते चौकार-षटकार ठोकतात. अरेला कारे म्हणण्याची ताकद त्यांच्यात आहे.
हेही वाचा – शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार

यापूर्वी सांगोल्याचे नेतृत्व अनेक वर्षे दुसऱ्याकडे होते. परंतु या दुष्काळी तालुक्यात वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न कायम होता. शहाजीबापू पाटील यांनी महायुती सरकारकडून हजारो कोटींचा निधी खेचून आणून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यांची काय ती भाषा, काय तो डायलॉग, समदं ओक्के.. आजची प्रचंड सभा पाहून शहाजी बापूंच्या विजयाबद्दल एकदम ओक्के वाटते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.





