जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी, राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी होणार आहे. कोहिनूर सीटीएनएलमधील IL&FS समूहाच्या इक्विटी गुंतवणुकीशी संबंधित ही चौकशी आहे. दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर जयंत पाटील हे ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
दुसरीकडे, ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी ईडीच्या बॅनरबाजी केली आहे. तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबई दाखल झाले आहेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा – मविआत नव्या वादाचे संकेत, विदर्भातील मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा
माझ्या नावावर एकही घर नाही. सांगलीतील घर वडिलांच्या नावाने होते. त्यांच्या पश्चात ते घर आईच्या नावावर झाले असून आता आईच्या पश्चात नाव बदलण्याचे काम सुरू आहे. कासेगावमध्ये थोडीफार शेती आहे. मात्र, वाटण्या झालेल्या नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलणार्यांना अडकविण्याचे काम सध्या सुरू असून मी अशा चौकशीला भिण्याचे कोणतेच कारण नाही, असे जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.