ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय पदभ्रमंतीचे आयोजन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन

कोल्हापूर : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येथे निर्भय पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचा निकाल १० मे रोजी लागला. या निकालावेळी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या चालवणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा तर खुनाचे सूत्रधार म्हणून आरोप असणाऱ्या डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे यांना आणि ॲड. संजीव पुनाळेकर याला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांमधून सबळ पुरावे सादर न केल्यामुळे निर्दोष मुक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सर्व परिवर्तनवादी संघटना आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी कोल्हापूर शहरातून बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनकामी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मार्गावर निर्भय पदभ्रमंतीचे आयोजन केले होते.

बिंदू चौकातील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून सुरुवात तर पापाची तिकटी येतील महात्मा गांधी आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून समारोप झाला. यावेळी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती म्हणाले, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे या डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना शिक्षा जाहीर झाली या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

डॉ. दाभोलकर यांचा खून हा एका व्यापक गटाचा भाग आहे असा दावा सीबीआयच्या आरोप पत्रात केला आहे. त्यांच्या या आरोपांना बळकटी देणारे पुरावे या तपास यंत्रणा सादर करू शकल्या नाहीत. त्यामुळे या खुनाचे सूत्रधार या खटल्यातून निर्दोष मुक्त झाले. याबद्दल सर्व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि सीबीआय यांनी सदर खुनाच्या सूत्रधारांना योग्य ती शिक्षा होण्यासंदर्भात उच्च न्यायालयात ताबडतोब अपील केले पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

कॉ. दिलीप पवार म्हणाले, डॉ. दाभोलकरांचे खुनी आणि सूत्रधार यांना वेळीच अटक केली गेले असते तर कदाचित पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून झाले नसते. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, दाभोलकरांचा खून हा एका व्यापक कटाचा भाग होता. अर्थात हा कट सामूहिक होता. तपास यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाला दाभोलकरांच्या कुणाच्या सुत्रधारांना निर्दोष सोडावे लागले. पुढे पानसरे यांच्या खून खटल्यात तरी सूत्रधारांवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठीचे आवश्यक ते पुरावे जमा करून ते न्यायालयात सादर केले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुनील स्वामी म्हणाले, गेली दहा वर्ष अहिंसक पद्धतीने कार्यकर्त्यांनी रस्त्यावरची लढाई लढून आपला असंतोष व्यक्त केला आहे. रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढत राहिल्यामुळे यशाच्या एका टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो. डॉक्टर दाभोलकरांचे लिखाण, काम आणि चळवळ यामध्ये कोणत्याही धर्माबद्दल द्वेषाचा एकही शब्द नसताना सुद्धा हिंदू धर्माच्या द्वेषातून त्यांचा खून झाला म्हंटले जाते. आरोपी आणि त्यांच्या समर्थकांचे हे म्हणणे आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉ बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, कॉ. दिलीप पवार, संभाजीराव जगदाळे, प्रा. सुभाष जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून समारोप झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button