breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी मंचावरील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची चर्चा; आज मोठी घोषणा करणार?

औरंगाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादेत स्वाभिमान सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मैदानावर सायंकाळी सहा वाजता सभेला सुरुवात होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र या सभेआधी मंचावर ठेवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याची जोरदार चर्चा होत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेच्या मंचावर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आला आहे. कधी नव्हे ते एवढा भव्य पुतळा शिवसेनेच्या जाहीर सभेच्या मंचावर ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या नामांतराविषयी मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर असं करण्यात यावं, ही शिवसेनेची जुनी मागणी आहे. त्यामुळे आता राज्यात पक्ष सत्तेवर असताना ही मागणी पूर्णत्वास यावी, अशी शिवसैनिकांची भावना आहे. तसंच या मुद्द्यावरून राजकीय विरोधकांकडूनही शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज नामांतराविषयी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा आणि उद्धव ठाकरे यांची सभा

शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. सभेच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली महिनाभरापासून तयारी केली जात आहे. चंद्रकांत खैरे यांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला असून, अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गट-गणापर्यंत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खैरे, दानवे यांनी केले आहे.

पूर्वतयारीसाठी दिग्गज नेते शहरात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी उपनेत्या डॉ. निलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर दोन दिवसांपासून औरंगाबादेत दाखल झाले आहेत. सभेसाठी औरंगाबाद शहरात वॉर्डा वॉर्डांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. उद्याने, आठवडी बाजार गाठून नागरिकांना सभेला येण्याचे आवाहन केले. सभेच्या निमित्याने औरंगाबादेत भगवे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्नदेखील शिवसेनेने केला आहे. प्रमुख उड्डाणपूल, चौक, रस्त्यांवर भगवे झेंडे, होर्डिंग लावण्यात आले आहेत.

दरम्यान, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, नागरिकांना सभा व्यवस्थित पाहता व ऐकता यावी यासाठी मैदानावर तीन स्क्रीन लावण्यात येणार आहेत. खडकेश्वर मंदिराच्या मैदानावरही स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून असलेले शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजू दानवे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button