‘महापालिका निवडणुका १ जानेवारीला’, दिलीप वळसे पाटलांच्या दाव्याने खळबळ

पुणे | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ३१ जानेवारीपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या निवडणुकांच्या संभाव्य तारखांबाबत भाष्य केले आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, २०१७ साली महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २०२२ मध्ये पुढच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं. परंतु, राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात गेलं. तिथेही हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे या निवडणुका तीन वर्षे पुढे ढकलल्या गेल्या. दरम्यानच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी जी तयारी केली होती ती वाया गेली.
हेही वाचा : India vs SA Womens Final | भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्या जेतेपदासाठी थरारक लढत!
आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की वाट्टेल त्या परिस्थितीत ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत. आता दोन-तीन दिवसांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असतील तर आपल्याला तयारी करावी लागेल. येथील स्थानिक निवडणुकीत १७ प्रभाग आहेत. त्यामुळे आपल्याकडून १७ लोकांना संधी मिळणार आहे. नगराध्यक्षांची निवड होणार आहे. सर्वांनाच संधी मिळणार नाही. ज्याला संधी मिळेल तो आपल्या पक्षाचा उमेदवार असेल. प्रत्येक उमेदवार हा घड्याळाचा (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उमेदवार आहे हे लक्षात ठेवून तुम्ही कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे, असं वळसे पाटील म्हणाले.
माझ्या माहितीप्रमाणे नगरपंचायतीच्या निवडणुका चालू असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील. साधारणपणे १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होईल. त्याआधी नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. १५ जानेवारीला त्यासाठीच मतदान होईल. ३१ जानेवारी पूर्वी सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन हा निवडणूक कार्यक्रम संपलेला असेल आणि नवीन लोकांच्या हातात सत्ता मिळालेली तुम्हाला दिसेल, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.




