मधुमेह आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता : शंकर जगताप
पिंपळेगुरवमध्ये मोफत मधुमेह रोग निवारण शिबीराचे शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन
![Need for public awareness about diabetes disease: Shankar Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/shankar-jagtap-780x470.jpg)
पिंपरी : भारतीय योग संस्थानच्या वतीने पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात आजपासून ८ मे पर्यंत “मोफत मधुमेह रोग निवारण” शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ०६.०० ते ०७.३० या वेळेत हे शिबीर होणार असून भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रसंगी, या शिबीरात सहभागी होत शंकर जगताप यांनी योगाचे धडे गिरविले. मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच हा आजार नियमित योग, योग्य उपचार आणि आत्मविश्वास याच्या बळावर पूर्णपणे बरा करता येतो हेच या शिबीराच्या माध्यमातून नागरिकांना सांगितले जाणार आहे. तणावमुक्ती हे मधुमेह नियंत्रणाचे सर्वात प्रभावी उपचार आहे. अशा शिबीराच्या माध्यमातून नागरिकांना तणावमुक्तीचे धडे मिळतात. असे सांगून त्यांनी या शिबीराच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले.
यावेळी संस्थानचे जिल्हा प्रधान रविंद्र पालकर, मिनाक्षी खैरनार, अनिता भोसले, इंदुमती पवार, विकास ढेरे आदी उपस्थित होते.