‘दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
पुढील १०० दिवसांमध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा
![Devendra Fadnavis said that the law should be strictly implemented to prevent milk adulteration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Devendra-Fadnavis-said-that-the-law-should-be-strictly-implemented-to-prevent-milk-adulteration-780x470.jpg)
मुंबई | दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुधातील भेसळीचा दूध उत्पादक आणि डेअरी यांनाही फटका बसतो. भेसळयुक्त दुधाच्या पुरवठ्यामुळे दूध उत्पादकांना कमी दर मिळतो. राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थात होणाऱ्या भेसळीवर समन्वयाने प्रतिबंधत्मक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या मोहिमा राबविण्यात येतील. तसेच दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. सी. एस. आर. च्या माध्यमातून दूध उत्पादकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ राज्यात चांगले काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील दुधाची उपलब्धता वाढवण्यावर भर द्यावा. विदर्भामध्ये दूध उत्पादनात वाढ झाली आहे. आणखी वाढीसाठी काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
हेही वाचा : ‘चित्रपटात आक्षेप असलेले दृश्य आम्ही काढून टाकणार’; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची माहिती
यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाचा तसेच येत्या शंभर दिवसात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा मांडला.
बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.