‘राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, त्यांना स्वप्न पाहूद्या’; फडणवीसांचा खोचक टोला
![Devendra Fadnavis said that Rahul Gandhi can become the President of America](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Devendra-Fadnavis-and-Rahul-Gandhi-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडतो आहे. तर ४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी २७२ ही मॅजिक फिगर आहे ती आम्ही गाठू आणि त्यानंतर काही तासांतच आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरेल असं म्हटलं आहे. तर राहुल गांधी यांनीही आता मोदी सत्तेवर येणार नाहीत असं म्हटलं आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते वाराणसी दौऱ्यावर आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी लहान असताना मुंगेरीलाल के हसीन सपने ही सीरियल लागायची. त्यात दाखवल्याप्रमाणे मुंगेरीलाल स्वप्नं बघायचा, तशीच स्वप्नं राहुल गांधींना पाहुद्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील अशी स्वप्नं त्यांना पडत असतील. त्यांना खुशाल स्वप्नं पाहुद्या लोकांनी मोदींना निवडलं आहे हे आम्ही पाहतो आहोत.
हेही वाचा – १ जून महिन्यापासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम
पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी काशीत प्रचाराला आलेलो नाही मी लोकांचं प्रेम पाहण्यास आलो आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.