पुणे बुद्धिमान लोकांचं शहर; मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
![Devendra Fadnavis said that Pune is a city of intelligent people.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Devendra-Fadnavis-4-780x470.jpg)
पुणे | नागपूरमध्ये पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. नागपूर मेट्रोची कामगिरी व वाटचाल यासंदर्भातला आढावा मांडणाऱ्या या पुस्तक प्रकाशनासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील मेट्रो वाटचालीचाही आढावा घेतला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पुणेकरांबाबत केलेलं असंच एक विधान सध्या चर्चेत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही पहिली मेट्रो मुंबईत सुरू केली. ११ किलोमीटरच्या मार्गासाठी ११ वर्षं लागली. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या काळात वेगानं आम्ही काम केलं. मुंबईत आम्ही पाच वर्षांत ३३५ किलोमीटर मेट्रोच्या जाळ्याची सुरुवात केली. नागपुरात ४ वर्षांत ३२ किलोमीटरच्या मार्गिका सुरू केल्या. पुण्यातही आम्ही तेच केलं. पुणेही सर्वाधिक वेगानं तयार झालेल्या मेट्रोपैकी एक ठरली आहे.
हेही वाचा – मास्टर माईंड ग्लोबल स्कूलतर्फे आयोजित अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
मी नागपूरच्या लोकांना सांगू इच्छितो की आम्ही आधी इथल्या मेट्रोसाठी कंपनी तयार केली होती ‘नागपूर मेट्रो’. पुण्यात बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती की तिथे मेट्रो तयार होईल वगैरे. पुणे हे बुद्धिमान लोकांचं शहर आहे. बुद्धिमान लोकांना एकत्र आणणं फार कठीण काम आहे. त्यामुळे मेट्रो भूमिगत बनेल, वरून बनेल, खालून बनेल याची चर्चा होती. एका बैठकी गडकरी आणि मी असे आम्ही दोघं होतो. त्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला की ही मेट्रो भूमिगत होणार नाही. नागपूरला जशी झालीये तशीच होईल. फक्त काही ठिकाणी गरज आहे त्यानुसार भूमिगत होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी दीक्षितजींचं काम पाहिलं होतं. त्यामुळे मी नागपूर मेट्रोला पुणे मेट्रोचं काम दिलं. पण पुण्याचे लोक नाराज झाले की नागपूरचं मॉडेल पुण्यात टाकण्याचा प्रयत्न होतोय वगैरे. मग मोठी गडबड झाली. म्हणे नागपूरवाल्यांना काम द्यायचं आहे म्हणून हे सर्व चालू आहे. मी दीक्षितजींना सांगितलं की नाव बदलून टाका. आम्ही एका दिवसात नागपूर मेट्रोचं नाव ‘महामेट्रो’ करून टाकलं. महामेट्रो कॉर्पोरेशन ही मूळची नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन आहे. आज देशभरातल्या विविध राज्यांकडून महामेट्रोला बोलावणं येत आहे की त्या राज्यांमध्ये मेट्रो उभारली जावी. महामेट्रोनं हे कौशल्य आणि वेग विकसित केला आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.