“दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला”; अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भावूक प्रतिक्रिया

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघतात निधन झाले आहे. बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना अपघात झाला. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच अजित पवारांच्या जाण्याने मी दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज सकाळी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित पवार यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती. अजित पवार हे संघर्ष करणारे नेते होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी कठीण दिवस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात.
हेही वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान ते देत होते, त्याचवेळी त्यांचं निधन झालं ही बाब अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान झालं आहे. दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला आहे. पवार कुटुंबावरही हा मोठा आघात आहे. मी आता लवकरच बारामतीमध्ये जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनाही मी घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. या घटनेबाबत त्यांनीही प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. संपूर्ण घटनेमुळे राज्यात हळहळ पसरली आहे. कुटुंबाकडून पुढील गोष्टी ठरवण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. महाराष्ट्रात आज शासकीय सुटी घोषित केली आहे. तसंच तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कधीही भरुन न निघणारं अशा प्रकारचं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती भरुन काढणं कठीण असतं. इतक्या जवळून, इतक्या संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. अजित पवार नाहीत या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही अशी स्थिती आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.




