दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावली; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली | दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. एका ४१ वर्षीय व्यक्तीने मुख्यमंत्री गुप्ता यांच्या कानशिलात लगावली आणि कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की केली. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपले नाव राजेशभाई खिमजीभाई साकरिया असे सांगितले आहे. तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी राजेशच्या पार्श्वभूमीची माहिती मिळवण्यासाठी राजकोट पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि त्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत.
हेही वाचा : गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री रेखा गुप्ता जनसुनावणीच्या वेळी लोकांशी संवाद साधत होत्या. त्या एका तरुणाने दिलेले कागद पाहत असताना त्याने अचानक त्यांच्या कानशिलात लगावली. यानंतर कार्यकर्त्यांशी झालेल्या धक्काबुक्कीत मुख्यमंत्र्यांचे डोके टेबलावर आदळले. कार्यकर्ते आणि उपस्थितांनी आरोपीला तात्काळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सिव्हिल लाइन्स पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.”
सचदेवा यांनी पुढे सांगितले की, डॉक्टरांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची तपासणी केली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. “या घटनेमुळे त्यांना धक्का बसला आहे, पण त्या लवकरच विश्रांती घेऊन पुन्हा जनतेत मिसळतील,” असे त्यांनी नमूद केले.




