TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

बेबंद कारभाराला आळा घालण्यासाठी भाजपला पराभूत करा – छगन भुजबळ

  • नाना काटे यांना विजयी करून भाजपला धडा शिकवा

चिंचवड : विरोधी बोलणार्‍या प्रत्येकाला कारागृहात डांबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर, खोट्या राष्ट्रवादाच्या मुद्दयावर बहुजन समाजातील तरूणांची डोकी भडकावून त्यांचा वापर करुन घेण्याचे कुटील राजकारण भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहे. त्यांच्या या बेबंद कारभाराला आळा घालण्यासाठी त्या पक्षाचा पराभव करणे ही काळाची गरज बनली आहे. त्याची सुरवात चिंचवडमधील पोटनिवडणुकीने होईल. या उद्दाम विचारणीच्या पराभवासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. पुनावळे येथील जाहीर सभेत भुजबळ बोलत होते.

व्यासपीठावर माजी मंत्री धनंजय मुंडे, उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह आमदार अमोल मिटकरी, आमदार आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, प्रकाश गजभीये, रविकांत वर्पे, महेश शिंदे, ईश्वर बाळबुधे, देवदत्त निकम, सलील देशमुख, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, सतिश दरेकर, वैशालीताई घोडेकर, समीर मासूळकर, शीतल हागवणे, संगिता ताम्हाणे, रेखा दर्शिले संदीप पवार, विजय दर्शिले, संजय अवसरमल, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, वर्षा जगताप, विजय लोखंडे, देवेंद्र तायडे, संगिता कोकणे, किरण देशमुख, कविता खराडे, युवराज पवार, अजित पोपट पवार, सागर ओव्हाळ, तुषार ताम्हाणे, पी. के. महाजन, अभिजित आल्हाट उपस्थित होते.

न्याययंत्रणेवर दबाव टाकून अख्खा पक्ष संपवण्याचा प्रयत्न !
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, सीबीआय आणि ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर या सत्ताधार्‍यांनी केलाच. पण निवडणूक आयोग आणि न्यायसंस्थांवरही दबाव आणून अख्खा पक्ष एका गटाच्या झोळीत घालण्याचे पाप या सरकारने केले आहे. आम्हीही शिवसेना सोडली. राज ठाकरे यांनी सोडली. नारायण राणेंनी सोडली. पण शिवसेना संपवावी, अशी भावना कोणीही व्यक्त केली नाही. एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून त्यांना इडी आणि सीबीआयच्या धमक्या देऊन शिवसेना संपवण्याचा कट भारतीय जनता पक्षाने आखला आणि निवडणूक आयोगातील आपल्या हस्तकांमार्फत तो अंमलात आणण्याचे प्रयत्न केले, असा आरोपही भुजबळ यांनी केला.

असली दडपशाही आणीबाणीतही नव्हती !
संजय राऊत त्यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढत होते. त्यांना तुरूंगात डांबले. नवाब मलिक विरोधात बोलत, त्यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवले. अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकवले. मला जामीनावर बाहेर आहात, अशा धमक्या दिल्या जातात, असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही हा भाग वेगळा. पण असली दडपशाही या देशाने आणीबाणीतही अनुभवली नसल्याची टीका भुजबळ यांनी केली.

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटला जातोय !
आज संविधान धोक्यात आले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे येथून पुढील काळात प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करावे लागेल, असे सांगून सत्तेचा माज चढलेल्यांना जनता पराभूत करत असते असा टोला भुजबळ यांनी लगावला. विकासाची कोणतीही दृष्टी नसल्यानेच राष्ट्रवादाचा आणि जातीयवादाचा खोटा बुरखा पांघरला जात आहे. हा बुरखा काढून यांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मी आपल्यापुढे नाना काटे यांना विजयी करण्यासाठी भरभरून मते देण्याचे आवाहन करण्यासाठी मी आलो असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

नाना काटेंना निवडून भाजपला धडा शिकवा
लोकशाही व्यवस्था धोक्यात आणण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी दूरदृष्टीने या शहराचा विकास केला. मात्र हे शहर भकास करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. माझ्या मराठवाड्यातील, खानदेशातील, विदर्भातील लोक पोट भरण्यासाठी येथे आले. या महानगरीने त्यांच्या पोटापाण्याची सोय केली. ती पवार साहेबांनी या शहराच्या विकासासाठी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे. विकासाची पोच म्हणून नाना काटे यांना विजयी करुन आपण आपली कृतज्ञतेची भावना दाखवून द्यावी, व भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही धोक्यात आणली जात आहे. विकास रखडलेला आहे. संसदेपासून सार्‍या स्वायत्त संस्थांना दडपून टाकण्याचा प्रकार होत आहे. या दडपशाहीला झूगारून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे विठ्ठल तथा नाना काटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button