ताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोदींच्या जिरेटोपावरून शिवभक्तांमधून पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची प्रफुल पटेलांवर टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांचे प्रमुख नेते तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल पटेल यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मोदी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर या नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर स्वहस्ते जिरेटोप चढवला. या प्रसंगाची चित्रफित समाजमाध्यमांवरून प्रसारित होताच महाराष्ट्रातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

वाराणसी येथून नामांकन दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर चढवलेल्या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेल्या जिरेटोपाविषयी काही संकेतही दृढ आहेत. असे असताना मोदी यांना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदेगटाने याबाबत सारवासारव करताना ‘यात मोदींचा दोष नाही’ असे म्हटले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरेटोप परिधान करू नये, असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करू शकतात. जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये,’ असा इशारा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिला. मोदी यांची मर्जी संपादन करण्यासाठी राज्यातील नेते किती लाचार होत आहेत, हे यावरून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.

दूरचित्रवाणीवर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त करताना ‘आपण काय करत आहोत, हे प्रत्येकाला कळायला हवे’ अशी प्रतिक्रिया दिली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी याविषयी सारवासारव केली आहे. ‘जिरेटोपावरून राजकारण करू नये, ज्यांनी जिरेटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष? अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही,’ असे स्पष्टीकरण उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी दिले तर,‘प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घातला त्यात मोदी यांचा काय दोष?’ असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

जिरेटोपाची विशेष ओळख
छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जशी त्यांच्या कार्यातून घडते तशीच त्यांची प्रतिमा त्यांच्या आणि त्यांच्यानंतरच्या छत्रपतींच्या वारसांच्या वापरातील शस्त्र आणि वस्त्रावरूनही ठसते. ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यातही या जिरेटोपाला विशेष स्थान होते.

छत्रपती शिवाजी महाराज्यांव्यतिरिक्त कोणीही जिरेटोप परिधान करू शकत नाही. इतर सर्व मावळे किंवा सरदार हे पगड्या, फेटे घालत होते. हा अधिकार केवळ छत्रपतींचा होता. इतर कोणीही हा अधिकार घेण्यास पुढे धजावलेला नाही. असा ऐतिहासिक संदर्भ आहे. शिंदे, होळकर यांच्या सारख्या बलाढ्य सरदारांनीही कधी जिरेटोप घातलेला नाही. मोदी यांची मर्जी मिळविण्यासाठी उत्साहाच्या भरात कोणी काहीही करीत आहे. उद्या राज्यभिषेक करून मोकळे होतील.

– जयसिंगराव पवार, लेखक, इतिहास अभ्यासक, कोल्हापूर

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button