#CoronaVirus: कोरोनाच्या मृतांचं राजकारण नको, आरोग्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
पालिकेच्या शीव रुग्णालयात करोनाच्या रुग्णाच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण विरोधी पक्षाचे काही लोक करू पाहात आहेत. करोनाच्या मृतांचे राजकारण करून मृतांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अपमानित करू नका, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मृतदेह काही दिवस पडून आहेत असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते तर शीव रुग्णालयात एका मृतदेहाशेजारच्या खाटेवर दुसरा रुग्ण असून परिचारिका तशाच परिस्थितीत रुग्णावर उपचार करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच भाजपाच्या काही नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही आक्षेप उपस्थित केले आहेत. याकडे लक्ष वेधून करोनाच्या लढाईत डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी आपल सर्वस्व पणाला लावून रुग्णांवर उपचार करत असताना किमान वस्तुस्थिती समजून घेऊन नंतरच योग्य ती टीका करणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.