breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले…

करोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका करत आंदोलन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.

पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे की, “आपण सारे करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विविधप्रकारे सामना करत आहोत. एकीकडे करोनाग्रस्तांना उपचार मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि दुसरीकडे करोनाव्यतिरिक्त विविध रुग्णांना-आजारी व्यक्तींना उपचार, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विविध आजारांचे प्रश्न पुढ्यात येत आहेत. अशावेळी शासन म्हणून करोनाग्रस्त आणि इतरही रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे नितांत गरजेचं आहे”.

“राज्यात बऱ्याच स्वयंसेवी संस्थांमार्फत थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना विशेषत: लहान मुलांनी नियमित स्वरुपात लागणारे रक्त उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी काही संस्थांनी नियमित रक्तदात्यांची साखळी तयार केलेली असते, तर काही संस्था सामाजित दायित्व म्हणून देणगी देणाऱ्यांवर अवलंबून असतात. तथापि सध्या करोनाच्या संकटात टाळेबंदी असल्याने त्यांनी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या संस्था अडचणीत आल्याने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा करणे हे अतिशय जिकरीचे काम होऊ बसले आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

“अशा रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा न झाल्यास आरोग्याच्या गंभीर समस्यांचा मुकाबला करावा लागू शकतो. या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने मदत दिल्यास मोठा आधार मिळू शकतो. आपण या विनंतीचा सकारात्मकपणे विचार कराल आणि निर्देश द्याल हा मला विश्वास आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे. करोनाशी लढा देताना उपाययोजना करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपाकडून शुक्रवारी राज्यभरात ‘माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलन करण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button