ताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची जोरदार मुसंडी

भाजपचा गड खेचून आणला

सोलापूर : भाजपसाठी प्रतिष्ठा आणि काँग्रेससाठी अस्तित्व पणाला लागलेल्या सोलापूर लोकसभा लढतीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारून भाजपचा गड खेचून आणला आहे. त्यांच्या विजयामुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर याचवेळी विस्कळीत काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करण्याचे आव्हान नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व त्यांचे वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पेलावे लागणार आहे. तर भाजपलाही पराभवाची कारणे शोधताना झालेल्या चुकांचे निराकरण करावे लागणार आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला गणल्या गेलेल्या सोलापुरात काँग्रेसअंतर्गत गटबाजी, डळमळीत जनाधार आणि कमकुवत होत गेलेल्या पक्ष संघटनेचा लाभ घेत भाजपने सोलापूरचा किल्ला करण्यात यश मिळविले होते (लिंगराज वल्याळ-१९९६), प्रतापसिंह मोहिते-पाटुल ( २००३), सुभाष देशमुख (२००४), शरद बनसोडे (२०१४) आणि डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी (२०१९) असे पाच खासदार भाजपकडून निवडून आले होते. विशेषतः २०१४ सालच्या मोदी लाटेनंतर भाजपने मागे वळून पाहिले नव्हते. विधानसभा निवडणुकीतही भाजपची ताकद वाढली असता त्यास पूरक म्हणून २०१७ सालच्या सोलापूर महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भाजपने चढती कमान ठेवली होती. यातच जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबीयांची साथ भाजपला मिळाली होती. मात्र ही वाढलेली ताकद भाजपने टिकवून ठेवणे अपेक्षित होते. त्याकडे दुर्लक्षच झाले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थिती पाहता सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर-मंगळवेढा या चारही विधानसभेच्या जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर मोहोळची विधानसभेची जागा महायुतीअंतर्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वर्स्वाखाली आहे. सोलापूर शहर मध्य ही एकमात्र विधानसभेची जागा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या ताब्यात आहे. संपूर्ण मतदारसंघात काँग्रेसची जनतेशी तुटलेली नाळ पाहता सोलापूरची लोकसभेची जागा भाजपकडून सहजपणे राखली जाईल, अशी सार्वत्रिक अटकळ बांधली जात होती. यातच भर म्हणून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतः प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. तथापि, पुढे स्वतः प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या मैदानात उतरल्या. एव्हाना, भाजपच्या विरोधात राजकीय चित्र तयार कसे निर्माण झाले हे कळलेसुध्दा नाही. सोलापूरकरांनी भाजपने राम सातपुते यांच्या रूपाने लादलेला उपरा उमेदवार नाकारून ‘ घरची लेक ‘ म्हणून प्रणिती शिंदे यांना स्वीकारले. मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा लढतीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे भाजपविरोधात मोठी मतविभागणी झाली होती. त्याची पुनरावृत्ती यंदा टळली.

ही प्रणिती शिंदे यांच्यासाठी पहिली जमेची बाजू होती. मराठा आरक्षण आंदोलनातून सत्ताधारी भाजपविरोधात वाढलेला मराठा समाजाचा रोष, कांदा निर्यातबंदीसह अन्य शेती प्रश्नावर शेतकरीवर्गात वाढलेली नाराजी, भाजपने लावलेल्या ‘ चारसौ पार ‘ च्या ना-यामुळे देशाचे संविधान बदलण्याची आंबेडकरी समाजात वाढलेली भीती हे भाजपसाठी मारक मुद्दे होते. यात सोलापूरच्या स्थानिक मुद्यांचा विचार करताना भाजपने यापूर्वी दहा वर्षात दिलेले दोन्ही खासदार विकास प्रश्नांवर निष्क्रिय ठरल्याची पसरलेली जनभावना, विमानसेवेसाठी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची चिमणी प्रशासनाने विरोध डावलून पाडल्यामुळे कारखान्याशी निगडीत वीरशैव लिंगायत समाजात वाढलेली नाराजी, यातच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे प्रचारकाळात जनतेला न आवडलेले वागणे-बोलणे आदी मुद्यांवर भाजपच्या विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. किंबहुना या नाराजीतून जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याची चर्चा वाढली होती. या पार्श्वभूमीवर भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी दिग्गजांच्या जंगी प्रचार सभांपासून ते गाव पातळीवरील प्रचारापर्यंत भाजपने धार्मिक ध्रुवीकरणावर जोर दिला. परंतु त्यास शहरी भागात आणि अक्कलकोटपुरत्या मर्यादेपर्यंत प्रतिसाद मिळाला खरा; पण त्यातून भाजपला विजयाचा मार्ग सापडला नाही. प्रचारात कितीही जोर लावला आणि सूक्ष्म राजकीय व्यवस्थापन केले तरी जनतेची नस भाजपला ओळखता आली नाही. येथेच भाजपच्या विजयाचे गणित बिघडले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button