म्हाडाने कॅन्सरग्रस्तांना दिलेल्या १०० खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
![CM postpones MHADA's decision to provide 100 rooms to cancer patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/cm-uddhav-thakare.jpg)
मुंबई – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी परळमधील टाटा रुग्णालयातील 100 कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले होते. परंतु या निर्णयाला आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी या म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. ज्या इमारतीतील खोल्या कॅन्सरग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्या इमारतीतील रहिवाशांची तक्रार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांशी चर्चा न करता परस्पर राष्ट्रवादीने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला स्थगिती दिली, अशी चर्चा असून यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतमतांतरं आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.