शहरातील खासदार, आमदार, पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी स्वखर्चाने ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त कोविड सेंटर उभारावे- मारूती भापकर
![City MPs, MLAs, Municipal Corporation office bearers, corporators should set up Covid Center with Oxygen and Ventilator at their own cost - Maruti Bhapkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/201804120735153482_Maruti-Bhapkar-Comments-BJP-should-stop-Vaalyacha-Valmiki_SECVPF.jpg)
पिंपरी |
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला असून ऑक्सिजन बेडचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शहरातील खासदार, आमदार, महापालिकेतील पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवकांनी स्वखर्चाने आयसीयु, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात मारूती भापकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात रोज तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना बाधित सापडत आहेत. प्रत्येक दिवशी ५० पेक्षा अधिक रुग्णांचे बळी जात आहेत. शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालय हाऊसफुल आहेत.कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडिसीवर इंजेक्शनसाठी खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडे मदत मागत आहेत. मात्र रुग्णांची प्रचंड वाढत असलेली संख्येमुळे त्यांच्या कडुनदेखील देखील बेड उपलब्ध होत नाही. प्रशासन व त्यांची तोकडी पडुन यंत्रणा हतबल झालेली दिसत आहे.
दरम्यान शहरातील आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक वेगवेगळी पत्रकबाजी करून वेगवेगळ्या मागण्या करताना दिसतात. ही वेळ कागदी घोडे नाचवण्याची नसून प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. शहरातील बहुतांशी लोकप्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक असून यांच्या पाचशे, हजार फ्लॅटच्या स्कीम शहरात सुरू आहेत. बहुसंख्य लोकप्रतिनिधींचे मोठमोठे मंगल कार्यालय आहेत. आम्ही आमच्या स्कीममध्ये अथवा मंगल कार्यालयात स्वखर्चाने कोविड सेंटर सुरू करू इच्छितो त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. असा पुढाकार घेताना कोणी हि दिसत नाही. पिंपरी चिंचवडकर यांचे मतदार असून ते आज रामभरोसे आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. एका सामान्य कुटुंबातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी अकराशे बेडचे कोविडसेंटर उभे करतो. श्रीगोंदा तालुक्यात सौ. अनुराधा नागवडे अडीचशे बेडचे कोविड सेंटर सुरू करतात. मग विभागातील आमच्या खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, अनेक नगरसेवक यांच्याकडे आमदार लंके यांच्या पेक्षा कितीतरी मोठी क्षमता आहे. तरी शहरातील क्षमता असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे आयसीयु, ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त छोटे-मोठे सेंटर खर्चाने सुरू करावीत. यासाठी लागणारी यंत्रसामग्री औषधे इंजेक्शने व प्रशिक्षित मनुष्यबळ याची तयारी करून या आणीबाणीच्या काळात पिंपरी चिंचवडकरांचा जीव वाचण्यासाठी ठोस काम, कृती करावी अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.
वाचा- #Lockdown: देशभरात लॉकडाउन होणार का?; गृहमंत्री अमित शाहांचं मोठं विधान