breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

चिंचवड पोटनिवडणूक: राष्ट्रवादीत उभी फूट! ; भाजपाची ‘स्लिपर सेल ॲक्टिव्ह’ 

आमदार अण्णा बनसोडे – नाना काटे यांच्यात जुंपली

पोटनिवडणूक बिनविरोध नव्हे, त्रिशंकू करण्याचा डाव

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवडमधील आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची ‘‘लिटमस टेस्ट’’ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रचंड प्रतिष्ठेची केली. मात्र, दोन दिवसांतच राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शहरातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि चिंचवड विधानसभेसाठी तीव्र इच्छुक असलेले माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे.

भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यानंतर अल्पावधीतच पोटनिवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली. या निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान, तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दिवंगत जगताप यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. शरद पवार, अजित पवार यांच्यावर नाराज होवून जगताप यांनी पक्ष सोडला नव्हता. जगताप घराण्यातील उमेदवार असेल, तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले होते. 

मात्र, ‘‘ही निवडणूक झालीच पाहिजे…’’ असा निर्धार राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला असून, तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. बनसोडे यांची भूमिका संवेदनशील असली तरी, राष्ट्रवादीचेच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आमदार बनसोडे यांना फटकारले आहे. त्यासाठी पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर आणि अंधेरी अशा पोटनिवडणुकांचा आधार दिली आहे. या निवडणुकीत भाजपाने राजधर्म पाळला नाही, मग आता ही निडणूक बिनविरोध होईल, अशी आशा सोडून द्यावी, असा इशाराच काटे यांनी जाहीरपणे दिला आहे. 

वास्तविक, भाजपाकडून चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. या करिता प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत स्थानिक आणि राज्यस्तरीय कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांत आपली प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. असे असतानाही राष्ट्रवादीतच दोन गट पडल्यामुळे निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीचा सांवळागोंधळ पहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादीचा ‘गेम’ होतोय का? अजित पवार यांनी सावध व्हावे!

चिंचवड मतदार संघात भाजपाची मोठी ताकद आहे. जगताप घराण्याला मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी सक्रिय आहे. भाजपा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी गेल्या दोन वर्षांत मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला आहे. त्यातच खासदार श्रीरंग बारणे यांच्या ‘शिंदे गटाची’ ताकद त्यांच्या मागे राहणार आहे. अशा परिस्थितीत २०१९ च्या निवडणुकीचा अनुभव पाहता भाजपा विरुद्ध सर्वपक्षीय अशी निवडणूक झाल्यास ‘‘काँटे की टक्कर’’ होवू शकते. पण, निवडणूक त्रिशंकू झाल्यास राष्ट्रवादीला विजय दुरापास्त आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीला चिंचवड आणि भोसरी मतदार संघात उमेदवारही देता आला नाही. त्यावेळी उमेदवारी नाकारणारे नाना काटे आज गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरले आहेत. त्यात ‘घड्याळ’ चा आग्रह धरुन आणखी गुंता करण्याचा डाव आहे. कारण, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनीही आम्ही इच्छुक असल्याचा दावा केला आहे. आजच्या घडीला प्रभावी इच्छुक असलेले तीन उमेदवार भाजपाकडून शंकर जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे असा सामना झाल्यासच भाजपाचा फायदा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवार दिलाच पाहिजे, राहुल कलाटेंनी माघार नाही घेतली पाहिजे, अशी व्यवस्था लावण्यात येत आहे. त्यासाठी भाजपातील एक ‘स्लिपर सेल’ राष्ट्रवादीच्या संपर्कात राहून राष्ट्रवादीचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ‘ॲक्टिव्ह’ झाली आहे. त्रिशंकू निवडणुकीचे सूत्र आहे.  त्याद्वारे राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये ‘हवा’ भरण्याचे काम सुरू आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षात घेतली पाहिजे. या निवडणुकीत पराभव झाल्यास, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही फटका बसू शकतो, अशी राष्ट्रवादीतील एका गटाची भूमिका आहे. वास्तविक, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव पाहता त्यांना कुणाच्या राजकीय सल्ल्याची आवश्यता नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे स्थानिक पातळीवर झालेले ठराव, प्रस्ताव आणि भीष्मप्रतिज्ञा किती परिणामकारक ठरतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button