breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी’; शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा!

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते, त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत ५ वरून १० कोटी तसेच वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकरिता २५ लाख वरून ५० लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. हा निधी तत्काळ वितरीत करण्याची सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरील नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रत्यक्ष पंढरपूर आणि क्षेत्रीयस्तरावर पोहचून देखरेख व संनियत्रण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेला ते मोहब्बत की दुकान म्हणतात का? नितेश राणेंचा सवाल

पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करा. विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्या.

वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्या. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमातून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असे नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत, त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button