“शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याला माझं समर्थन”; छगन भुजबळ
अजित पवार यांनी कधीही संभाजी महाराजांचा अपमान केला नाही
पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर आता भाजपा चांगलीच आक्रमक झालेलं आहे. ठिकठिकाणी अजित पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चे निघत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवारांना जाणता राजा का म्हणतात? यावर भाष्य केलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार यांनी कधीही संभाजी महाराजांचा अपमान केला नाही. काही दिवसांपूर्वी राज्यपालांसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे या मुद्यावरून जनतेचं लक्ष दूर करण्यासाठी अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. तसेच संभाजीराजांनी स्वराज्याचे रक्षण केलं म्हणून त्यांना स्वराज्यरक्षक म्हटलं जातं. पण कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता, असं छगन भुजबळ म्हणाले.
सोबतच, शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याला माझं समर्थन आहे. कारण जो राज्यकर्ता असतो, त्याला पूर्वीच्या भाषेत जाणता राजा म्हटले जात होते. शरद पवारांनी सरकारच्या माध्यमांतून अनेक गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, मुंबई, नाशिकमध्ये अनेक उद्योग शरद पवार यांनी आणले. शिक्षणक्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, त्यांनी मोठं काम केलं आहे. त्यांच्यामुळेच आज महिलांना आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणतात. जनतेच्या समस्यांशी एकरूप होऊन, जो प्रश्न मार्गी लावतो, तो जाणता राजा असतो, असेही छगन भुजबळ म्हणाले.