‘मी तुमच्या हातातलं खेळणं नाही’; छगन भुजबळ पक्षाच्या नेत्यांवर संतापले

Chhagan Bhujbal | महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळातून काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे भुजबळ यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यावरून प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया देत. आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे, असं म्हटलं आहे. यावरून छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, की नक्कीच मी सहा महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जाण्याची इच्छा वरिष्ठांपुढे व्यक्त केली होती. परंतु, तेव्हा त्यांनी मला नकार दिला. ते मला म्हणाले, ‘आता आपण सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार आहोत’. त्यावर माझी काही हरकत नव्हती. त्यानंतर त्यांनी मकरंद पाटील यांच्या भावाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देखील मी राज्यसभेचा विषय काढला होता. मात्र वरिष्ठांनी मला नकार दिला. त्यांनी सांगितलं की ‘आम्ही मकरंद पाटील यांना शब्द दिला आहे’. तेव्हा मला सांगण्यात आलं की ‘तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघात विजय मिळणं कठीण आहे. तुम्ही निवडणूक लढत असाल तर आपले कार्यकर्ते जोमाने राज्यभर काम करतील’.
हेही वाचा – ..तर आयसीसीने माझे पाय धुवून पाणी प्यावं; शोएब अख्तरचं धक्कादायक वक्तव्य
मी त्यावरही हरकत घेतली नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मी व माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता मी विधानसभा निवडणुकीत जिंकलो आहे. आता ते लोक मला म्हणतात की ‘आपण मकरंद पाटील यांना मंत्री केलं आहे. आता त्यांच्या भावाला आपण राजीनामा द्यायला सांगू आणि तुम्हाला आपण राज्यसभेवर पाठवू’. परंतु, त्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी असं केलं तर ही माझ्या मतदारसंघातील लोकांची प्रतारणा होणार नाही का? मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? असं छगन भुजबळ म्हणाले.
मला त्यांना विचारायचा आहे, मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला म्हणाल, राज्यसभेवर जा, तुम्ही म्हणाल बस तेव्हा बसायचं, तुम्ही उठ म्हणाल तेव्हा उठायचं, तुम्ही म्हणाल तेव्हा निवडणूक लढवायची… ते सगळं जाऊ द्या, मी जर उद्या माझा राजीनामा दिला तर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल? ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांना काय वाटेल? त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं आहे आणि आता निवडणूक झाल्यावर महिनाभरात मी राजीनामा कसा देऊ? उलट मी माझ्या वरिष्ठांना म्हटलं की मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघातील कामं मला पूर्ण करू द्या. एक-दोन वर्षांनी आपण यावर विचार करू. परंतु, तुम्ही म्हणाल बस बस तर मी बसायचं… तुम्ही म्हणाल उठ उठ तर मी उठायचं… हा छगन भुजबळ तसा माणूस नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.





