‘..तरीही मराठा समाजात भाजपाबद्दल असंतोष आहे’; चंद्रकांत पाटलांचं विधान
![Chandrakant Patil said that there is dissatisfaction with the BJP in the Maratha community](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Chandrakant-Patil-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुक निकालांचे पडसाद विधानसभा निवडणुकांवरदेखील पडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं दिसत आहे. महत्वाचं म्हणजे महायुतीने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली होती. यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्या. मात्र, पण त्यानंतरही मराठा समाजात भाजपाबद्दल असंतोष आहे असं आमच्या चर्चेतून समोर आलं आहे. हा असंतोष का आहे? यावर आमची सविस्तर चर्चा झाली. शेवटच्या मराठा माणसापर्यंत आम्ही दिलेल्या गोष्टींबाबत माहिती पोहोचवण्यात, योजनांची मदत पोहोचवण्यात कमी पडलो आहोत. ही माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे.
हेही वाचा – ‘जनाई शिरसाई योजना बंदीस्त पाईपलाईनद्वारे राबविण्यासाठी ४५० कोटी रुपये देणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार
अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी १९८२ साली आत्महत्या केली. पण १९८२ ते १९९५ पर्यंत अण्णासाहेब पाटलांच्या नावाने साधं महामंडळ करण्याचाही विचार त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात आला नाही. पहिलं अण्णासाहेब पाटील महामंडळ १९९५ साली आलं. त्यानंतर आमचं सरकार गेलं. पुढच्या जवळजवळ १५ वर्षांत ५० कोटींच्या वर या महामंडळासाठी तरतूद गेली नव्हती. २०१४ नंतर ती तरतूद हजार कोटींपर्यंत गेली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण आणि सवलती या गोष्टी वेगळ्या केल्या. आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. २०१७ साली मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात टिकवलं. ते गेलं उद्धव ठाकरेंच्या काळात. पुन्हा मिळवलं एकनाथ शिंदेंच्या काळात. तरी मराठा समाजाचा रोष आहे? यासाठी आम्ही विचारमंथन केलं. त्यातून आणखी काही गोष्टी करण्याचे मुद्दे आले. निवडून येण्यासाठी जी मतं लागतात, ती न मिळण्यामागच्या अनेक कारणांमध्ये हे एक कारण आहे की मराठा समाजाला ज्या सुविधा दिल्या, आरक्षण दिलं त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना एकत्र सोबत घेऊ शकलो नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.