TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणराष्ट्रिय

चापेकर वाड्याचा पर्यटन विकास आराखड्यानुसार विकास करावा : आमदार अश्विनी जगताप

मोरया गोसावी मंदिर विकासासाठी निधीची पूर्तता करण्याची मागणी

पिंपरी: श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करा. तसेच चाफेकर वाड्याचा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी (दि. २३) विधानसभेत केली.

विधानसभेत सन २०२३ -२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेत आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी भाग घेतला. त्यावेळी त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना अभिवादन करून ही मागणी केली.

आमदार जगताप म्हणाल्या, “माझ्या चिंचवड मतदारसंघातील पवना नदीच्या तीरावरील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर हे पुरातन जागरूक देवस्थान असून चिंचवड या ठिकाणी सदगुरू महासाधु श्री मोरया गोसावी यांनी योगमार्गाने संजीवन समाधी घेतली असून याला ४६० वर्षे पूर्ण झाले आहेत. राज्यभरातून व शहरातील लाखो भाविक श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी पुण्यतिथी उत्सवाला व दरमहा चतुर्थीला मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी येतात. श्री मोरया गोसावी मंदिर देवस्थान व मंगलमुर्ती वाडा परिसर सुशोभीकरण करणे, पादुकामंदिर,सभा मंडप, संरक्षण भिंत उभारणे, मुख्य प्रवेशद्वार जतन संवर्धन व दर्जा वाढ करणे इत्यादी कामांकरिता शासनाच्या पर्यटन स्थळ विकास कार्यक्रम अंतर्गत श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करावी.

तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एकाच कुटुंबातील तीन भावंडानी दिलेले बलिदान संपूर्ण देशामध्ये एकमेव स्फूर्तीदायक उदाहरण असलेले क्रांतिवीर चापेकर बंधूचा जन्म, बालपण व शिक्षण हे चिंचवडच्या ऐतिहासिक भूमीत झालेले आहे. चाफेकर वाड्याला हजारो देशभक्त व पर्यटक भेट देतात. श्री क्षेत्र चिंचवड क्षेत्राचा विकास व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या सहकार्याची व निधीची नितांत आवश्यकता आहे. चिंचवड या धार्मिक व ऐतिहासिक स्थळाचा शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा.

त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मावळ तालुक्यात लोणावळा खंडाळा राजमाची कार्ला येथे थंड हवेच्या ठिकाणी देशभरातून पर्यटक येतात. लोणावळा-खंडाळा परिसराचा राष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड विसापूर किल्ल्यांचे संवर्धनाची दुरुस्ती, पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवणे त्याचबरोबर श्री एकविरा माता कार्ला लेणी व शिरगाव साई मंदिर येथे हे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार पर्यटकांसाठी व भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा उभारण्याकरिता निधीची आवश्यकता आहे.

मावळ तालुक्यातील पर्यटनासाठी विशेष लोणावळा-खंडाळा कार्ला याचा सर्वांगीण पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत शासनाने नियोजनबद्ध सदर परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button