पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी हॉस्पिटलसाठी केंद्र शासनाचा ४१ कोटींचा निधी!
भाजपा नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांची वस्तुनिष्ठ माहिती : राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या डोळ्यांत अंजन
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । मोशी येथे उभारण्यात येणारे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रासाठी संजीवनी आहे. हजारो लोकांना या ठिकाणी अत्याधुनिक उपचार घेण्याची सुविधा निर्माण होत आहे. या प्रकल्पाची संकल्पना आणि पाठपुरावा आमदार महेश लांडगे यांनी केला. त्यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून आतापर्यंत ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आमदारांनी किती निधी आणला? असा निराधार दावा करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, अशी ठाम भूमिका मोशी प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाचे नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी मांडली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने मोशी येथे ७०० बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. मात्र, आमदारांनी किती निधी राज्य शासनाकडून आणला? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. त्याला भाजपाचे नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
महापालिका सभागृहात बोलताना विरोधी पक्षाचे नगरसेवक सातत्त्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’, वेस्ट एनर्जी म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती आणि मोशी येथील ७०० बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अशा प्रकल्पांबाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात. यामुळे शहराची बदनामी होते आहे. या भागाचा स्थानिक नगरसेवक म्हणून अशा निराधार आरोपांना जशास तसे उत्तर देणे क्रमप्राप्त आहे, असेही निखिल बोऱ्हाडे यांनी म्हटले आहे.
निखिल बोऱ्हाडे म्हणाले की, मोशी हॉस्पिटलसाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून निधीही मंजूर करुन घेतला. सदर जागा ही राज्य शासनाच्या अधिकारात होती. ती महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात आला. आता या प्रकल्पासाठी आतापर्यंत ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. आगामी काळात आणखी निधी उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात स्वत: ज्येष्ठ आणि अनुभवी समजणारे नगरसेवक आहेत. अनेकजन टीडीआर, एसआरए, बिल्डिर, ठेकेदार त्यांच्यासोबत पार्टनरशीप करतात. त्यामुळे नगरसेवकपदाचा वापर कुणावर बिनबुडाचे आरोप करण्यासाठी करु नये. यापुढील काळात कोणी बिनबुडाचे आरोप करीत असतील, प्रशासकीय काळातील कामे आणि आमदार-खासदारांवर आरोप करीत आहेत. त्यांना सर्व माहिती जमा करुन आरसा दाखवण्यात येईल. शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांबाबत बिनबुडाचे आरोप करुन शहराची बदनामी करणाऱ्यांविरोधात या पुढील काळात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.
– निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक, मोशी प्रभाग-२, भाजपा.





