बैलगाडा शर्यतः आमदार महेश लांडगे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावरील पोस्टवरून शाब्दिक युद्ध सुरू
![Bullock cart race, MLA Mahesh Landge, and MP Amol Kolhe, supporters, on social media, from the post, war of words started.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/mahesh-landge-Amol-kolhe-780x470.png)
पुणेः
बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने आता राजकीय श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचे समर्थक देखील सरसावले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत बैलगाडा शर्यती संदर्भात अनेकदा आवाज उठवला होता. यासोबतच त्यांनी योग्य पाठपुरावा देखील केला होता. खासदार कोल्हे यांनी अनेकदा याबाबत जाहीर सभेत सांगितलेलं आहे. दुसरीकडे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून दिल्लीला जाऊन बैलगाडा शर्यती संदर्भात पाठपुरावा केला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने या आमदार आणि खासदार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक युध्द सुरू झाले आहे. बैलगाडा शर्यातीला मिळालेल्या परवानगीच्या समर्थनार्थ लांडगेंच्या समर्थकांनी ‘पैलवानानं करून दाखवलं’ अशा आशयाची पोस्ट करत खासदार कोल्हेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे या निर्णयावरून आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवाद पाहायला मिळत आहे. या निकालानंतर आमदार महेश लांडगे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावरील पोस्टवरून शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे.
जिल्हा विभाजनाच्या मागणीवरून आमनेसामने
काही दिवसांपूर्वीच आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली होती. त्यावर कोल्हे यांनी केवळ जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी करून लोकांचे राहणीमान उंचावणार नाही. त्यामुळे केवळ राजकीय रंग न देता सर्वसामान्य जनतेच्या जीवनात काय फरक पडणार आहे याची रूपरेषा समोर आली पाहिजे, असे म्हणत लांडगेंना टोला लगावला होता.
दरम्यान, बैलगाडा शर्यतींमुळे गावाकडच्या यात्रांमध्ये उत्साह संचारला असून मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीन यात्रांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बैलांना मोठी किंमत मिळणार असून शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.