भाजपने मोठा भ्रष्टाचार केला, तो जनतेसमोर यायला हवा; नाना काटे
![BJP did big corruption, it should come before people; Various forks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Image-2023-02-14-at-6.35.10-AM-780x470.jpeg)
पिंपळे सौदागरची स्मार्ट वार्ड म्हणून ओळख
भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपला धडा शिकवा
पिंपरी चिंचवड : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावरून नाना काटे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. जनतेच्या महत्त्वाच्या मुद्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असं नाना काटे यांनी म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची पाच वर्षे सत्ता होती. मात्र, पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने मोठा भ्रष्टाचार केला आहे. भाजपचा भ्रष्टाचार जनतेसमोर यायला हवा. लाचखोरी, खंडणी आणि भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपला धडा शिकवा, असं आवाहन नाना काटे यांनी केलं आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता आल्यापासून पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्यांमध्ये नो वॉटर नो वोट, असे बॅनर लावण्यात आलेले आहेत. यामुळे सध्याची काय परिस्थिती आहे?, हे आपल्याला दिसत आहे, असं नाना काटे म्हणतात.
माझा यापुर्वीचा जो वार्ड आहे पिंपळे सौदागर स्मार्ट वार्ड म्हणून ओळखला जात आहे. नगरसेवक म्हणून पिंपळे सौदागरचे 20 वर्ष प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळेच आयटी क्षेत्रातील काम करणारे सुशिक्षित मतदार आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास नाना काटे व्यक्त करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केलेला आहे. हे जनता चांगलेच माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे शहराचा विकास झाला आहे, असंही नाना काटे म्हणाले आहे.
दरम्यान, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. त्यातच नाना काटे हे वारकरी सांप्रदायाशी निगडीत असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग चिंंचवडमध्ये आहे. राष्ट्रवादीचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते अशी नाना काटे यांची ओळख आहे. चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने आम्हाला कौल द्यावा, असं नाना काटे म्हणाले.