भाजपची स्थानिक निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची जम्बो यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींसह दिग्गजांची फौज मैदानात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचार मोहिमेला वेग दिला असून, भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पक्षातील सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी महायुती म्हणून, तर काही ठिकाणी स्वबळावर लढवणार आहे. स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विजयासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने जाहीर केलेली दिग्गज नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी पाहता, पक्षाने ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धां
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राज्य आणि केंद्रातील प्रभावशाली नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल आणि शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांची नावे समाविष्ट आहेत. ही यादी पाहता भाजपने राज्यातील सर्व प्रदेशांना प्रतिनिधित्व दिलं असून, पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंतचे नेते मैदानात उतरवले आहेत.
सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई
विधानसभा निवडणुकांनंतर ही राज्यातील पहिली मोठी निवडणूक होत आहे. तसेच राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांसह सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर आता या निवडणुकीत मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




