BIG NEWS : पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर नेत्यांची ‘‘व्हाया देवगिरी- सागर बंगल्यावर ‘पॉलिटिकल सेटलमेंट’
विधान परिषदेवर वर्णी लावण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ : विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण पूर्णत: पालटणार!
![BIG NEWS : "Political settlement" of senior leaders in Pimpri-Chinchwad via Devagiri- Sagar bungalow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Ajit-Pawar-Devendra-Fadanvis-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणाला कलाटणी मिळणार असून, शहरातील एक मातब्बर नेत्याची व्हाया देवगिरी- सागर बंगल्यावर ‘पॉलिटिकल सेटलमेंट’ झाली आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये किंवा डिसेंबर अखेर रिक्त होणाऱ्या विधान परिषद सदस्यपदी संबंधित नेत्याला ‘सागर संजीवनी’ मिळणार असून, शहरातील महायुतीच्या आमदारांची संख्या ६ होणार आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा तगडा सामना होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीचे ५ आमदार आहेत. मात्र, तरीही महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे ‘रिस्क’ नको म्हणून मविआच्या दिग्गज नेत्यांना जाळ्यात घेण्याची रणनिती महायुतीच्या पक्षश्रेष्ठींकडून आखली जात आहे.
सध्यस्थितीला शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघामध्ये महायुतीला आव्हान देवू शकतील असे अनुक्रमे ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक राहुल कलाटे आणि माजी आमदार विलास लांडे असे तगडे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे उमेदवारीबाबत साशंकता असल्यामुळे तीव्र इच्छुकांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्ष अशा दोन्ही पक्षातील श्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. ‘ऑप्शन-बी’ म्हणून ‘‘मला विधान परिषदेवर घ्या… मी निवडणुकीत महायुतीला सहकार्य करतो’’ अशी भूमिका एका दिग्गजाने घेतली आहे. त्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी एकत्रितपणे पक्षश्रेष्ठींना भेटले आहेत.
शहराच्या राजकीय इतिहासामध्ये माजी महापौर आझम पानसरे- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप असोत किंवा जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे असोत.. अशी राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांचा राजकीय समझोता शहराने पाहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहराला १५ वर्षांपासून एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांची ‘‘पॉलिटिकल सेटलमेंट’’ पहायला मिळणार आहे.
‘पॉलिटिकल सेटलमेंट’वाले ‘ते’ दिग्गज नेते कोण?
दरम्यान, शहरातील तीनही विधानसभा मतदार संघांचा विचार करता महायुतीमधील प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ चिन्हावरील दोन आणि राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर एक आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपामध्ये महायुतीच्या सूत्रानुसार, भोसरी आणि चिंचवडची जागा भाजपाकडे जाणार हे निश्चित आहे. पिंपरीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहणार आहे. परिणामी, चिंचवड आणि भोसरीतील अजित पवार यांचे समर्थक आणि इच्छुक यांची अडचण होणार आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत किंवा डिसेंबर अखेर रिक्त होणाऱ्या विधान परिषद सदस्यपदी यापैकी एकाला संधी दिल्यास महायुतीची बाजू भक्कम होईल, अशी चर्चा द्विपक्षांमध्ये झाली. त्यासंदर्भात सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर नियोजनाप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर विविध बाजुंनी चर्चेचा खल झाला. संबंधित दिग्गज नेत्याला ‘शब्द’ ही मिळाला आहे. यावेळी दोन कट्टर प्रतिस्पर्धी नेते एकत्रित उपस्थित होते. त्यामुळे मुंबईत झालेल्या या राजकीय घडामोडींमधील दिग्गज नेते कोण? असा प्रश्न निर्माण होतो. पिंपरीतून आण्णा बनसोडे यांचे विरोधक ॲड. गौतम चाबुकस्वार, चिंचवडमधून जगताप विरोधक राहुल कलाटे की भोसरीतून महेश लांडगे विरोधक विलास लांडे यापैकी कोण असू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जातो. विशेष म्हणजे, ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये काळजी नसावी… महायुतीचे तीनही आमदार निवडून आणू..’’ असे ‘अभिवचन’ शहरातील दिग्गज नेत्यांनी दिले आहे. त्यांच्या महायुतीमधील निर्णायक भूमिकेमुळे राजकीय फायदा होणार का? हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.