मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडमध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चा सहा ठिकाणी छापा!
सेवा विकास सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणात कारवाई
![Big news: Enforcement Directorate (ED) raids at six places in Pimpri-Chinchwad!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ED-pimpri-chinchwad-780x470.jpg)
पिंपरी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे 450 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने मंगळवारी पुन्हा कारवाई केली. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी, रहाटणी, काळेवाडी फाटा, भाटनगर परिसरात 5 ठिकाणी तर पुण्यातील औंधमध्ये एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
काय प्रकरण आहे?
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी 124 बोगस कर्ज प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात, सुमारे 430 कोटी रुपये अनियमितपणे विविध व्यक्ती आणि संस्थांना वाटण्यात आले. कर्जासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना कर्ज देण्यात आले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता आणि इतर बाबी तपासल्या जात नाहीत. त्यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधर यांनी 2020 मध्ये या कर्जांचे ऑडिट केले होते. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती.
ईडीची कारवाई
सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील चार ते पाच ठिकाणी ईडीने २७ जानेवारी रोजी छापे टाकले. त्यावेळी मूलचंदानी यांच्या घरावर छापा टाकून तो नऊ तास आपल्या बेडरूममध्ये लपून बसला होता.
आता पुन्हा कारवाई
पिंपरी आणि औंध येथे राहणारे अमर मूलचंदानी यांचे दोन नातेवाईक, त्यांचा पीए आणि पिंपरीत राहणारा एक कर्मचारी आणि काळेवाडी फाटा येथील पॉश सोसायटीत राहणारे दोन जवळचे उद्योगपती आणि महापालिका कंत्राटदार बंधू यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. कारवाईदरम्यान ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मूलचंदानी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील त्याच्या दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहिती मूलचंदानी यांना दिल्याचा आरोप आहे. त्याच्यावर गुप्त फाईल्स लीक केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या चालकालाही ईडीने अटक केली आहे.