breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सणासुदीत ‘व्होकल फॉर लोकल’ व्हा, ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा चीनला शह, ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार’

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

सणासुदीच्या काळात, मुख्यत: दिवाळीमध्ये चिनी वस्तूंनी बाजार भरलेला असतो. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावरून ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार’ ही मोहीम राबविली जात आहे. त्याचा फटका चीनच्या उद्योगांना बसला आहे. या पार्श्वभूमिवर सणासुदीच्या काळात ‘व्होकल फॉर लोकल’ला प्राधान्य द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे चीनला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या 93व्या भागात नागरिकांना ‘व्होकल फॉर लोकल’साठी आवाहन केले. मागील काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये सणांसोबत ‘व्होकल फॉर लोकल’ हा संकल्प देखील आपण घेतला आहे. आता सणाच्या या आनंदात आपल्या स्थानिक कारागिरांना, शिल्पकारांना आणि व्यापाऱ्यांना देखील सामावून घेत आहोत. आगामी २ ऑक्टोबरला येणाऱ्या गांधी जयंतीचे औचित्य साधत हे अभियान मोठ्या स्तरावर राबविण्याचा संकल्प करूया, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

खादी, हातमाग, हस्तकला या सर्व उत्पादनांसोबत स्थानिक वस्तू देखील नक्की विकत घ्या. जेव्हा सगळे एखाद्या सणामध्ये सहभागी होतात तोच त्या सणाचा खरा आनंद आहे; म्हणूनच स्थानिक उत्पादनांशी निगडित लोकांना आपण पाठबळ दिले पाहिजे. आपण सणाच्यावेळी ज्या भेटवस्तू देतो त्यामध्ये अशा उत्पादनांचा समावेश करणे हा एक उत्तम, पर्याय आहे, असे मोदी म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आपण आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट देखील साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यावेळी हे अभियान अधिक विशेष आहे. स्वातंत्र्यवीरांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली असेल. यावेळी तुम्ही खादी, हातमाग, हस्तकलेची उत्पादने विकत घेण्याचे सर्व विक्रम मोडून काढा, अशी विनंती पंतप्रधानांनी केली.

सणांमध्ये पॅकिंग आणि पॅकेजिंगसाठी मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. स्वच्छतेच्या या अभियानात प्लास्टिकचा हानिकारक कचरा हा देखील आपल्या सणांच्यामागे असलेल्या भावनांच्या विपरित आहे. म्हणूनच, आपण स्थानिक स्तरावर उत्पादित प्लास्टिकविरहित पिशव्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या इथे तागाच्या, सुती, केळीच्या झाडापासून तयार केलेल्या अशा पारंपरिक पिशव्यांचा वापर पुन्हा एकदा वृद्धिंगत होत आहे. सणाच्या निमित्ताने याला प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे आणि स्वच्छतेसोबतच आपली आणि पर्यावरणाची देखील काळजी घ्या, असेही मोदी यांनी सांगितले.

चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव
येत्या 28 सप्टेंबर रोजी आपण भारतमातेचे शूर सुपुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. त्याचे औचित्य साधून चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घ काळापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. हुतात्म्यांची स्मारके, त्यांची नावे दिलेली स्थाने आणि संस्थांची नावे आपल्याला कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरणा देतात. काही दिवसांपूर्वीच कर्तव्य पथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून असाच एक प्रयत्न केला आहे आणि आता चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे, हे या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button