लढाई आरपार… राहुल कलाटे यांची माघार नाहीच! महाविकास आघाडी ‘बॅकफूट’वर!
![Battle across... Rahul Kalate is not retreating! Mahavikas Aghadi on 'backfoot'!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Rahul-kalate-pcmc-12-780x470.jpg)
भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवाराला फायदा
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘बॅकफुट’वर गेली आहे. विशेष म्हणजे, याचा फायदा भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना होणार असून, त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतून राहुल कलाटे यांनी माघार घेण्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. आज सकाळी शिवसेना नेते सचिन अहिर यांनी कलाटे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी देखील कलाटे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कलाटे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत.
त्यामुळे भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी त्रिशंकू लढत होणार आहे. परिणामी, महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार असून, भाजपाला फायदा होणार आहे.
बिनविरोध न केल्यामुळेच कलाटेंचे बंड…
वास्तविक, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अल्पावधीतच पोटनिवडणुकीची घोषणा झाली. जगताप कुटुंबीय या दु:खातून अद्याप सावरले नाही. त्यामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये उमेदवारी दिलेली असताना आणि अवघ्या दहा महिन्यांचा कालावधी असल्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वपक्षीय नेत्यांची भावना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक लावण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. तसेच, ‘‘घड्याळ’’ चिन्हावर आणि राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला महाविकास आघाडी उमेदवारी मिळावी याकरिता मोर्चेबांधणी करण्यात आली. त्यामुळे सुरवातीपासूनच कलाटे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला. विशेष म्हणजे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आपली इच्छा होती. राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घ्यावा. मीसुद्धा निवडणूक लढणार नाही, असा पवित्रा कलाटे यांनी घेतला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. निवडणूक बिनविरोध न केल्यामुळेच राहुल कलाटे यांनी बंड केले. याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे.