बारामती दुष्काळी भागातील जिरायती हा शब्द कायमचा काढून टाकणार
...पण त्या अगोदर माझ्या बायकोच्या चिन्हा समोर बटण दाबा, बारामतीत अजित पवारांची तुफान बॅटिंग
![Baramati will remove the word arable from drought-prone areas forever](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/AJIT-PAWAR-2-780x470.jpg)
बारामती : बारामती तालुक्यातील काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वेळी या भागातील नागरिक दुष्काळी भागाकडे लक्ष द्या, असे वारंवार बोलत असतात. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी तुम्हाला विनंती करतो की सारखं सारखं जिरायती भाग.. जिरायती भाग.. म्हणू नका. मी एकदाचा तो जिरायत शब्दच काढून टाकणार आहे. हा भाग जिरायती न राहता. जसा कॅनलच्या कडेचा भाग बागायती झाला आहे.. तसा अलीकडील भागही.. बागायती करू.. आणि जिरायती शब्दच काढून टाकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील विविध गावात त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. तालुक्यातील उंडवडी कप येथील सभेत पवार बोलत होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्यासाठी तुमचे पवित्र मत आणि साथ दिली तर मतदान झालं निकाल लागला की दुसऱ्याच दिवशी अजित पवार कामाला लागलाच म्हणून समजा. धडाधड अधिकाऱ्यांना सूचना देऊन, धडाधड प्लांट तयार करून मंजुऱ्या घेऊन, कामे मार्गे लावू असे आश्वासन देताच उपस्थितांमधून एकच वादा अजित दादा अशा घोषणा येऊ लागल्या. यावर अजित पवार म्हणाले की, अरे थांब थांब… जोर राहू दे! सात तारखेपर्यंत एवढा जोर असला तर चांगलेच आहे. लईच भारी आहे.