‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’; बाळासाहेब थोरात यांची मागणी
![Balasaheb Thorat said that President's rule should be implemented in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/balasaheb-thorat-780x470.jpg)
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. अशातच राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर विरोधी पक्षातील नेते जोरदार टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेत आमचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पद आम्हाला मिळाले. तशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे. ही परिस्थिती का आली? एका वर्षात दोनदा पक्ष फोडणं आजपर्यंत कधी झालं नाही. राज्याच्या राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती कधीही पाहिली नाही.
हेही वाचा – रोटरी क्लब निगडीच्या अध्यक्षपदी हरबिंदर सिंग तर सचिवपदी शशांक फडके
आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाही..नाही..नाही..म्हणणारे अखेर त्यांच्यासोबतच गेले. फडणवीस जे बोलतात त्यांच्या उलट वागत आले आहेत. एक मुख्यमंत्री, एक पूर्वीचा मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री, दुसरा एक उपमुख्यमंत्री झाला. त्याला आता मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. पण इथे आता तीन तलवारी एका म्यानात आहेत, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
राज्यात सगळीकडे भ्रष्टाचार चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून जनतेत प्रचंड नाराजी आहे. आमदारांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यात असे सरकार नको. त्यापेक्षा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.