बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधात शड्डू ठोकला; म्हणाले..
![Bachu Kadu said whether we are in Mahayuti for Lok Sabha or not](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Bacchu-Kadu-1-780x470.jpg)
Bacchu Kadu | प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी त्यांची भाजपावरील नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. भाजपाने प्रहारला या चर्चेत सामावून घेतलं नसल्यामुळे बच्चू कडू यांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवरच निवडणूक घ्यायला लावू, असं ठणकावून सांगितलं आहे.
बच्चू कडू म्हणाले की, लोकसभेसाठी आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही? हा संभ्रमित करणारा प्रश्न आहे. आम्ही लोकसभेची तयारी सुरू केली आहे. आम्हाला कुणी विचारलं तर एकत्र येऊ, नाही विचारलं तर विरोधात लढू. आम्ही (प्रहार जनशक्ती पार्टीने) ‘मी खासदार’ अभियान राबविण्याची तयारी करत आहोत. एका मतदारसंघात २०० ते ३०० उमेदवार उभे करण्याची आमची तयारी आहे, लोकसभेसाठी सर्वाधिक उमेदवारांची यादी आम्ही जाहीर करू. जवळपास दोन ते तीन हजार उमेदवार जाहीर करण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे.
हेही वाचा – Biodiversity Park : रेडझोन प्रभावित तळवडेसुद्धा आता विकासाच्या स्पर्धेत अग्रेसर!
लोकांचे मतदान कुठे जाते? हे समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझं मत कुठं जातं? हे पाहण्यासाठी आम्ही शेकडो उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभे करू. जेणेकरून सरकार आणि निवडणूक आयोगाला आगामी लोकसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागेल, असं झालं तर आम्ही आमच्या अभियानात जिंकलो असं समजू. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रहार सर्वात पुढे राहील, असं बच्चू कडू म्हणाले.
आमच्यावर याआधी वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली आहे. परंतु, आम्ही आमच्या मतदारसंघात काम करण्यावर लक्ष केंद्रीत केलं. आमच्या मतदारसंघात रखडलेली कामं आम्ही केली याचं आम्हाला समाधान आहे. दुसरं महत्वाचं काम म्हणजे दिव्यांग मंत्रालय तयार झालं. सगळं बरं चाललंय, याचा अर्थ असा नाही की, त्यांनी (भाजपा) आमचा सरकारमधील वाटा विसरावा. हे सरकार बनवताना आमचा सिंहाचा वाटा होता. आम्ही सरकारमध्ये सामील झालो नाही. मुळात हे सरकारच आम्ही बनवलंय. भाजपा मात्र नंतर या सरकारमध्ये सामील झाली आहे. हे भाजपावाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.