पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! ज्येष्ठ नेत्याचं शरद पवारांना समर्थन
![Azambhai Pansare supports Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Azambhai-Pansare-780x470.jpg)
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी शरद पवार यांना समर्थन दर्शवले आहे. आझमभाई पानसरे यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.
शहरातील मुस्लिम समाज पानसरे यांच्या पाठिशी आहे. पक्षातील फुटीनंतर पानसरे यांची भूमिका समोर आली नव्हती. दरम्यान, त्यांनी शरद पवार यांची भेट घेत समर्थन दिलं आहे. पानसरे हे शहरातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी शहराचे महापौरपद भूषविले आहे. लोकसभा निवडणुकीचाही अनुभव आहे. पिंपरी मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. पानसरे ज्यांना साथ देतात, तो पिंपरीचा आमदार होतो हे मागील तीन निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हेही वाचा – टोल दरवाढीवरून मनसेचा राज्य सरकारला इशारा; राज ठाकरे म्हणाले..
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटाने पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, दोन नगरसेवक वगळता सर्व माजी नगरसेवक, शहर कार्यकारीणीने अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर शरद पवार गटाची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.