breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संतापजनक! जात पंचायतीकडून बहिष्कार; रदबदलीसाठी पैशांची मागणी

  • वाद सांगली-कोल्हापूरच्या पती-पत्नीचा; निवाडा मात्र सोलापुरात

सोलापूर |

पती-पत्नीचा कौटुंबिक वाद जात पंचायतीमध्ये गेला आणि जात पंचायतीने पत्नीच्या बाजूने न्यायनिवाडा करीत पतीवर सामाजिक बहिष्कार घालून त्यास वाळीत टाकले. बहिष्कार मागे घेण्यासाठी पुन्हा दोन लाखांची मागणी केल्याप्रकरणी जात पंचायतीच्या चौघा पंचांना सोलापुरात पोलिसांनी अटक केली आहे. गोंधळी समाजाशी संबंधित या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील पती सांगलीत राहतो, तर पत्नी कोल्हापुरात राहते. त्याचा न्यायनिवाडा मात्र सोलापुरात होऊन पतीला वाळीत टाकण्याचा प्रकार घडला. शरणीदास पांडुरंग भोसले (वय ४०, रा. मांगले, ता. शिराळि, जि. सांगली) यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित चौघा जात पंचांविरूध्द गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली आहे. राम धोंडिबा शिंदे-पाटील, अशोक शिंदे-पाटील, नाना शिंदे-पाटील व संतोष राम शिंदे-पाटील अशी अटक करण्यात आलेल्या जात पंचांची नावे आहेत.

फिर्यादीनुसार शरणीदास भोसले याचा विवाह कोल्हापूर येथील माया नावाच्या तरुणीशी झाला होता. त्यांना तीन अपत्ये झाली. मात्र नंतर दोघा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून भांडणे सुरू झाली. त्यातूनच पत्नी माया पतीला सोडून निघून गेली. हा वाद समाजात मिटावा म्हणून शरणीदास भोसले यांनी जात पंचायतीकडे धाव घेण्याचे ठरविले. भोसले हे मूळचे सोलापूरचे राहणारे असून त्यांचे पूर्वजही सोलापुरातच राहतात. त्यामुळे हा कौटुंबिक वाद सोलापूरच्या गोंधळी समाजातील जात पंचायतीकडे नेण्यात आला. जात पंचायत भरल्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पत्नी माया हिच्या बाजूने न्यायनिवाडा करण्यात आला. यात शिक्षा म्हणून शरणीदास भोसले यांना समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकण्यात आले. २०१८ सालापासून भोसले हे बहिष्काराचे बळी ठरले आहेत. त्यांची आई आणि सख्खा भाऊ  सोलापुरात राहतो. आई आजारी असून तिच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे शरणीदास भोसले यांना समजले. तेव्हा आईला भेटण्यासाठी त्यांचे मन व्याकूळ झाले. त्याप्रमाणे आजारी आईला भेटण्याची इच्छा त्यांनी आपल्या भावाला कळविली. परंतु सख्खा भाऊ  असूनही त्याने जात पंचायतीची भीती पुढे करून, तू जर आईला भेटायला आलास तर जात पंचायत आम्हांलाही वाळीत टाकेल. त्यापेक्षा तू आईला भेटायला न आलेलेच बरे, असा निरोप कळविला. दरम्यान, शरणीदास यांनी जात पंचायतीच्या संबंधित पंचांकडे शरण जात बहिष्कार मागे घेण्याची विनवणी केली असता बहिष्कार मागे घेण्यासाठी जात पंचांनी दोन लाख रुपयांची मागणी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button